Sat, Dec 14, 2019 03:23



होमपेज › Konkan › डंपरची मोटारसायकलला धडक; महिला ठार

डंपरची मोटारसायकलला धडक; महिला ठार

Published On: Jun 17 2019 2:10AM | Last Updated: Jun 17 2019 2:10AM




दोडामार्ग : वार्ताहर 

वाळू वाहतूक करणार्‍या डंपरची मोटारसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात शुभांगी चंद्रकांत सोंदेकर (वय 42, रा. दोडामार्ग बाजारपेठ) यांचा उपचारादरम्यान बांबोळी-गोवा येथे मृत्यू झाला. डंपर पायावरून गेल्याने त्यांचे दोन्ही पाय या अपघातात जायबंदी झाले होते. हा अपघात शनिवारी रात्री 10.30 वा.च्या दरम्यान घडला. अपघात घडताच डंपरचालकाने पळ काढला. त्यामुळे संतप्‍त झालेल्या जमावाने डंपरच्या काचा फोडल्या.

शुभांगी या पती चंद्रकांत सोंदेकर यांच्यासोबत मुंबईला जाणार्‍या आपल्या विवाहित मुलीला निरोप देण्यासाठी बांद्यात गेल्या होत्या.  त्या घरी परतत असताना मणेरी-कुडासातिठा येथे रात्री 10.30 वा.च्या सुमारास वाळू वाहतूक करणार्‍या डंपरची त्यांच्या मोटारसायकलला धडक बसली. यात सौ. शुभांगी रस्त्यावर कोसळल्या. तर त्यांचे पती बाहेर फेकले गेले. डंपरची डाव्या बाजूची दोन्ही चाके शुभांगी यांच्या पायावरून गेली आणि कमरेतूनच त्यांचे पाय जायबंदी झाले. या अपघातानंतर डंपरचालकाने डंपर तेथेच ठेवून पळ काढला. तोपर्यंत मोठ्या प्रमाणात जमाव जमला. या जमावाने 108 रुग्णवाहिकेला कळवून जखमी अवस्थेत शुभांगी सोंदेकर यांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात  उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बांबोळी-गोवा रुग्णालयात नेण्यात आले. 

याठिकाणी त्यांचा उपचारादरम्यान रात्री 12.30 च्या सुमारास मृत्यू झाला. दरम्यान, अपघात घडल्याची माहिती दोडामार्ग पोलिसांना कळवूनसुद्धा पोलिस घटनास्थळी उशिरा दाखल झाले. त्यामुळे संतप्त जमावाने अपघातग्रस्त डंपरची मोडतोड केली. या अपघाताची नोंद दोडामार्ग पोलिस ठाण्यात करण्यात आली असून फरार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मयत सौ. शुभांगी यांच्यावर सोमवारी उशिरा त्यांच्या मूळ गावी पडवे-माजगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यांच्या पश्‍चात पती, दोन मुलगे, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.