Sun, Apr 21, 2019 03:55होमपेज › Konkan › दारू विक्रीविरोधात दोडामार्ग तालुक्यातील महिला आक्रमक

दारू विक्रीविरोधात दोडामार्ग तालुक्यातील महिला आक्रमक

Published On: Mar 16 2018 10:54PM | Last Updated: Mar 16 2018 10:20PMदोडामार्ग : प्रतिनिधी

दोडामार्ग तालुक्यातील गावागावात अनधिकृत दारुअड्डे सुरू आहेत. मात्र, दोडामार्ग पोलिस  हे दारूअड्डे बंद करण्यात अपयशी ठरत आहेत, असा आरोप करत   शुक्रवारी  तेरवण - मेढे ग्रुप ग्रा.पं.च्यावतीने शेकडो महिलांनी पोलिस निरीक्षक सुनील घासे यांना कारवाईसाठी लेखी निवेदन दिलेे. येत्या चार दिवसांत तालुक्यातील ही अवैध दारू विक्री बंद  न झाल्यास तालुक्यातील महिलांचा मोर्चा ठाण्यावर आणण्यात येईल, असा इशारा या महिलांनी दिला. या पूर्वी  कोनाळ, झरेबांबर या गावातील महिलांनीही असाच इशारा पोलिसांना दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात या महिलांनी म्हटले आहे,  दोडामार्ग तालुक्यात गावठी दारुचे अवैध धंदे राजरोस सुरू आहेत. तसेच मटका, जुगार आदी गैरधंदे सुरू असून यामुळे अनेकांचे सुखी संसार उद्ध्वस्त होत असताना पोलिस यंत्रणा मात्र, सुशेगात आहे. काही दिवसांपूर्वी कोनाळ येथील महिलांनी   गावातील दारू विक्री बंद करावी, यासाठी पोलिसांना निवेदन दिले होते. त्यावर पोलिसांनी केवळ  सोपस्कारापुरती कारवाई केली. हा उठाव करणार्‍या महिलांना  दारू विक्रेते, व्यवसायांकडून धमक्या देण्यात आल्या. मात्र, त्यावर  पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली. दोन दिवसांपूर्वी झरेबांबर गावातील बहुसंख्य महिलांनी पोलिसांना निवेदन सादर करत गावातील दारू विक्रीबाबत लक्ष वेधले. शुक्रवारी तेरवण, तेरवण-मेढे, सोनावल, पाळये गावातील शेकडो महिलांनी पोलिस ठाण्यावर धडक दिली आणि पोलिस निरीक्षक श्री. घासे यांना या गावातील दारू विक्री बंद केव्हा करणार? असा सवाल केला.  संतप्त महिलांनी त्यांना चार दिवसात तेरवण-मेढे ग्रुप ग्रा.पं.च्या हद्दीतील दारू विक्री बंद न झाल्यास आम्ही चारही गावातील हजारो महिला पोलिस ठाण्यावर मोर्चा आणू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

दोडामार्ग तहसीलदार रोहिणी रजपूत यांची भेट घेवून या महिलांनी त्यांना दारुविक्री बंदी बाबतचे निवेदन सादर केले. त्यानंतर तहसीलदारांनी सहाय्यक पोलिस अधिकारी श्री. पाटील यांना प्रत्येक गावातील दारू विक्री धंदे तत्काळ कामयस्वरूपी बंद  करण्याचे आदेश दिले.

तालुक्यातील महिलांच्या या लढ्याला  दोडामार्ग तालुका युथ हेल्पलाईनचा सदैव पाठिंबा राहणार असल्याचे अध्यक्ष वैभव इनामदार यांनी सांगितले. तहसीलदार आणि पोलिसांना निवेदन देताना मनिषा गवस, सुहासिनी गवस, दक्षिणा डेगवेकर, सुवर्णा लांबर, प्रेरणा गवस आदींसह एकता ग्रामसंघातील 22 बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.