Thu, Apr 25, 2019 03:25होमपेज › Konkan › मोबाईल टॉवरच्या नावाखाली महिलेला ६४ हजारांचा गंडा!

मोबाईल टॉवरच्या नावाखाली महिलेला ६४ हजारांचा गंडा!

Published On: May 10 2018 1:36AM | Last Updated: May 09 2018 11:10PMसावंतवाडी :  प्रतिनिधी

‘घरावर फोर जी चा मोबाईल टॉवर लावून 60 लाख रुपये अनामत रक्‍कम  आणि दरमहा भाडे मिळवा’ अशी जाहिरात करुन तसेच 15 लाखांचा बोगस चेक ईमेलवर टाकून  सावंतवाडी- तळवडे  येथील एका महिलेला बेंगलोरस्थित एका कम्युनिकेशन कंपनीने 64 हजार 150 रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी फसवणूक झालेली महिला मधुरा मधुकर नाईक (रा.तळवडे-गोठावडेवाडी) हिने दिलेल्या तक्रारीनुसार बेंगलोर- जयनगर येथील युनिव्हर्सल कम्युनिकेशन या कंपनीविरुद्ध  सावंतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  या प्रकरणात सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापिका भाग्यलक्ष्मी मेस्त्री यांच्या सतर्कतेमुळे पुढील फसवणूक टळली. 

मुंबईच्या एका वृत्तपत्रात  ‘आपल्या मोकळ्या जागेवर फोर जी मोबाईल टॉवर लावा व  अ‍ॅडव्हान्स 60 लाख रुपये तसेच दरमहा भाडे मिळवा’ अशी जाहिरात आली होती. या जाहिरातीत संपर्कासाठी तीन मोबाईल नंबर दिले होते. या मोबाईल नंबरवर मधुरा नाईक यांनी संपर्क साधला असता बेंगलोर- जयनगर येथील युनिव्हर्सल कम्युनिकेशन कंपनीचे नाव सांगत शर्मा नामक महिला कर्मचार्‍याने तिच्याशी संवाद साधला. 

या नंतर 17 एप्रिल 2018 ला  सदर महिलेने श्रीमती मधुरा यांच्याशी संपर्क साधून सॅटॅलाईटद्वारे टॉवरसाठी आपली तळवडे येथील जागा निश्‍चित केल्याचे सांगून यासाठी नोंदणी फी रु.2850 भरण्यास सांगण्यात आले.  पैसे भरण्यासाठी तिने एनसस बँकेचा खाते क्रमांक व आयएफसी कोड मोबाईलवर एसएसएमएसद्वारे पाठविला. त्यानंतर मोबाईल टॉवरच्या साहित्यासाठी रु. 22 हजार 500 भरुन घेतले. दरम्यान टॉवरच्या  विम्यापोटी 38 हजार 800 भरुन घेतले. असे मिळून 64 हजार 150 रु. सौ. मधुरा यांच्याकडून भरुन घेण्यात आले. पैसे जमा झाल्यानंतर काही दिवसांनी शर्मा नामक महिलेने सौ. मधुरा यांना आपला मोबाईल टॉवरच्या जागेचा भाड्याचा पहिला हप्ता म्हणून 15 लाख रुपयांचा चेक तयार आहे, असे सांगून चेकची स्कॅन कॉपी मधुरा हिच्या ईमेल आयडीवर पाठविली. 

मोबाईल टॉवर उभारणीपोटी 60 लाख रुपये जमीन मालकाला अनामत रक्‍कम, शिवाय दरमहा 80 हजार रुपये भाडे व प्रत्येक वर्षी भाड्यात 10 टक्के भाडेवाढ आणि जमीन मालकाच्या घरातील एका व्यक्‍तीस दरमहा 25 हजार रुपये पगाराची नोकरी असे आमिष शर्मा नामक महिलेने दाखविले.

महिला बचतगटातून घेतले कर्ज 

या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मधुरा नाईक या कोलमडून गेल्या. त्यांनी त्या शर्मा नामक महिलेला पुन्हा फोन करत ‘तुम्ही मला फसवत तर नाही ना. हे पहा, माझ्या पतीची बायपास झाली असून मी महिला बचतगटाकडून कर्ज घेऊन तुम्हाला पैसे भरले आहेत’ असे काकुळतीला येऊन  सांगितले. यावर श्रीमती शर्मा हिने आपल्या मुलाची शपथ घेत आम्ही तुम्हाला फसवत नाही.तुम्हाला 60 लाख रुपये अनामत रक्‍कम म्हणून नक्‍की मिळेल,अशी भावनिक ग्वाही सौ. मधुरा यांना दिली.

बँक व्यवस्थापिकेच्या सर्तकतेमुळे टळली पुढील फसवणूक

सोमवारी 7 मे 2018 रोजी सदर शर्मा नामक महिलेने 15 लाख रुपये खात्यावर जमा करणार असल्याचे सौ. मधुरा यांना सांगितले. त्यासाठी तुम्ही आपल्या बँकेमध्ये उपस्थित रहा, असेही सांगितले. त्यानुसार मधुरा नाईक सोमवारी सकाळी सावंतवाडी येथील सेंट्रल बँक शाखेत उपस्थित राहिल्या. काही वेळाने श्रीमती शर्मा यांनी सौ. मधुरा यांना फोन करुन तिच्या खात्यावर रक्‍कम ट्रान्सफर होत नसल्याचे सांगितले असता सौ. मधुरा यांनी  बँकेच्या शाखा व्यवस्थापिका भाग्यलक्ष्मी मेस्त्री यांची भेट घेतली. श्रीमती मेस्त्री यांनी  आमच्या शाखेच्या खात्यावर कितीही रक्‍कम ट्रान्सफर होण्यास अडचण नसल्याचे सांगितले. सौ. मधुरा यांनी श्रीमती शर्मा हिला फोन करुन तो फोन बँक मॅनेजर श्रीमती मेस्त्री यांना जोडून दिला.

त्यावेळी श्रीमती शर्मा यांनी चालू खाते उघडणे आवश्यक असल्याचे सांगताच श्रीमती मेस्त्री यांनी तिला चांगलेच झापले. आधी खाते उघडण्यास का नाही सांगितले?  अशी विचारणा करत आम्ही सौ. मधुरा यांना तत्काळ खाते उघडून देतो, तुम्ही रक्‍कम ट्रान्सफर करा, असे  सांगितले.  त्यावर श्रीमती शर्मा यांनी आता चालू खाते नको, त्याऐवजी 45 हजार 700 रुपये कंपनीच्या खात्यावर जमा करा म्हणजे 15 लाख 45 हजार 700 रुपये एकाच वेळेस बँक खात्यावर ट्रान्सफर करते, असे  सांगितले.यामुळे श्रीमती मेस्त्री यांना या व्यवहाराबाबत शंका आली. यासाठी त्यांनी सौ. मधुरा यांना  ईमेलवर पाठविलेल्या धनादेयाची फोटो कॉपी पाहिली असता, या प्रकरणातील फसवणूक त्यांच्या निदर्शनसा आली.  कारण चेकवर रजिस्ट्रेशन नंबर नसल्याने हा चेक बोगस असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही बाब श्रीमती मेस्त्री यांनी मधुरा नाईक यांच्या लक्षात आणून देत हा फसवणुकीचा फंडा असल्याचे सांगितले.  सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापिका भाग्यलक्ष्मी मेस्त्री यांच्या जागरुकतेमुळे सौ. मधुरी यांची फसवणूक टळली.