Sun, Apr 21, 2019 14:06होमपेज › Konkan › मोटारसायकल प्रवासात आरोग्यसेविकेचा मृत्यू

मोटारसायकल प्रवासात आरोग्यसेविकेचा मृत्यू

Published On: Feb 19 2018 1:22AM | Last Updated: Feb 18 2018 9:03PMकणकवली : वार्ताहर

कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्यसेविका म्हणून कार्यरत असलेल्या अनिता बळवंत गायकवाड ऊर्फ अनिता नारायण कांबळे (50) यांचा मोटारसायकलवरून जात असताना चक्‍कर यऊन पडून मृत्यू झाला. हा अपघात महामार्गावर वारगावतिठा येथे रविवारी सकाळी घडला. नडगिवे येथून अनिता  सावंतवाडी येथे नर्सिंग प्रशिक्षणाकरिता जाण्यासाठी महामार्गावर कुणकवण बसस्टॉपवर आल्या होत्या. त्या वाहनाची प्रतीक्षा करत होत्या.

याच वेळी त्यांच्या ओळखीचे प्रतीक जाधव हे मोटारसायकलने खारेपाटणहून कणकवलीच्या दिशेने येत होते. तळेरे बसस्थानकापर्यंत जाण्यासाठी अनिता त्यांच्या मोटारसायकलवर बसल्या. मोटारसायकल  वारगांवतिठा येथे आली असता अनिता यांना चक्‍कर आल्याने प्रतीक जाधव यांनी मोटारसायकल थांबविली. अनिता मोटारसायकलवरून खाली उतरल्या असता चक्‍कर आल्याने त्या महामार्गावर कोसळल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी खारेपाटण प्रा.आ. केंद्रात हलविण्यात आले. तेथून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले; मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याची खबर पती बळवंत श्रीपती गायकवाड यांनी पोलिसांना दिली.

खारेपाटण हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक बी. एस. गायकवाड यांच्या त्या पत्नी  होत. त्यांच्या आकस्मिक निधनाने खारेपाटण तसेच कासार्डे-तळेरे परिसरात हळहळ व्यक्‍त  होत आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर खारेपाटणमधील ग्रामस्थ, हायस्कूलचे शिक्षक, प्रा. आ. केंद्राचे कर्मचारी यांनी कणकवली रुग्णालयात धाव  घेतली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास कणकवलीचे पोलिस उपनिरीक्षक डी. वाय. चव्हाण करत आहेत.