Tue, Jun 02, 2020 19:47होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा

सिंधुदुर्गात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा

Published On: May 29 2018 1:37AM | Last Updated: May 28 2018 10:06PMकणकवली : वार्ताहर

सिंधुदुर्गात येत्या 24 तासांत विजांचा गडगडाट व सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान खात्याच्या या अंदाजानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मान्सून अंदमानच्या दक्षिण भागात दाखल झाला आहे. लवकरच तो केरळमध्ये दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

यंदा भारतात मान्सून लवकर दाखल होणार, असे मत तज्ज्ञांनी व्यक्‍त केले होते. त्यानुसार, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा मान्सून दाखल झाला आहे. अंदमानमधून हा मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि त्यानंतर भारताच्या इतर भागांत दाखल होतो. देशाच्या सर्व भागांत मान्सून दाखल होण्यासाठी हवामान अनुकूल असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. लवकरच हा मान्सून गोव्यासह महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्याबरोबरच येत्या दोन दिवसांत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाने शरीराची झालेली लाहीलाही आता काही प्रमाणात कमी होणार असल्याची चिन्हे आहेत.

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यावर त्यापुढील 24 ते 48 तासांत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्वीप बेटांचा परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालची खाडी या मार्गाने वाटचाल करतो. दरवर्षी साधारणत: 1 जून रोजी मोसमी पावसाचा केरळमध्ये प्रवेश होतो. मात्र, हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदाचे वर्ष अपवादात्मक असणार आहे.

नियोजित वेळेच्या सात दिवस आधीच पावसाचा प्रवेश होणार आहे. मागील वर्षी 30 मे रोजी मोसमी पाऊस केरळच्या किनारपट्टीवर आला होता. सध्या केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा येथे मान्सूनपूर्व पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. स्कायमेटकडूनही मान्सून यंदा वेळेआधी दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.