Tue, Mar 26, 2019 11:41होमपेज › Konkan ›  आगामी 24 तासात कोकणात वादळी पाऊस

 आगामी 24 तासात कोकणात वादळी पाऊस

Published On: May 19 2018 10:55PM | Last Updated: May 19 2018 10:37PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणावर अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. आंबा हंगाम अखेरच्या टप्प्यात असतानाही अवकाळीचे मळभ दाटल्याने बागायतदारांसह मत्स्य व्यावसायिकही धास्तावले आहेत. शनिवारीही मळभी वातावरण असताना रविवारी वादळी -वार्‍यासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने हवाई संदेशाद्वारे वर्तविली आहे. त्यानुसार कोकणातील पाचही जिल्हा प्रशासनांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

गतवर्षी  डिसेंबर महिन्याच्या प्रारंभी कोकणात ‘ओखी’चा तडाखा बसला होता. त्या नंतर सातत्याने वातावरणात झालेल्या बदलाचा परिणामाने अवकाळी पावसाचे दुष्टचक्र कोकणावर कायम आहे.  मे महिन्यातही अवकाळीचे सावट  पहिल्या पंधरवड्यासह दुसर्‍या पंधारवड्यातही सुरूच आहे. त्याला वादळी वार्‍याचीही साथ लाभल्याने अनेक भागात त्याचा तडाखा बसला आहे. गेल्या आठवड्यात शुुक्रवारी  रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा तालुक्यात पाऊस झाला तर त्यानंतर दुसर्‍या दिवशी शनिवारी चिपळूण तालुक्याला वादळी वार्‍याचा फटका बसला होता. शनिवारी  रत्नागिरी तालुक्यासह संगमेश्‍वर आणि लांजात वादळी वार्‍यासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली होती.

मात्र, अपवादात्मक सरी वगळता दिवसभर  मळभी वातावरणाचा स्तर कायम होता. आंबा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात असताना  अवकाळीचे मळभ बागायतदारांची धास्ती वाढवू लागले आहे. सुरुवातीच्या म्हणजे आंबा हंगामाच्या प्रारंभीच्या टप्प्यातही अवकाळीचे ग्रहण लागले होते.  मधल्या टप्प्यावरही अवकाळीने फळगळतीसह  आंबा पिकावर फुलकिडीचा आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याचे संकट होते तर आता तिसर्‍या टप्प्यात अखेरचे उत्पादन हाती असताना अवकाळीने  आंबा व्यवहारातील गणिते विस्कटून टाकली आहेेत तर वादळमय स्थितीने मत्स्य व्यावसायिकांचे वेळापत्रकही कोलमडून टाकले आहे.

जिल्ह्यात या आठवड्यात गुरूवारी जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे आलेल्या वादळी वार्‍याने पाच तालुक्यांत लाखोंची हानी केली होती.   दरम्यान, रविवावारी म्हणजे आगामी 24 तासात कोकणात वादळी वार्‍यासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. पावसाचा जोर रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राहणार असून या पावसाने रायगड, पालघर या जिल्ह्यांचा काही भाग व्यापेल, असा अंदाज वेधशाळेन वर्तविला आहे. त्या नुसार येथील प्रशासनांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना करताना पोलिस यंतत्रणेलाही सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत.