Wed, Mar 27, 2019 02:26होमपेज › Konkan › निवती रॉक आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र बनविणार 

निवती रॉक आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र बनविणार 

Published On: Mar 09 2018 11:29PM | Last Updated: Mar 09 2018 11:04PMकणकवली : प्रतिनिधी
अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पावेळी सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला चालना देणार्‍या अनेक प्रकल्पांची घोषणा करत त्यासाठी तरतूदही केली. त्यामध्ये प्रामुख्याने वेंगुर्ले येथील निवती रॉकखाली असलेल्या सागरी विश्‍वाचे दर्शन पर्यटकांना घडविण्यासाठी देशातील पहिली बॅटरी ऑपरेटेड पानबुडीची जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, जेणेकरून जगभरातील पर्यटक जिल्ह्यात येतील आणि परकीय चलन मिळेल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. यामुळे निवती रॉक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र बनणार आहे. शिवाय पर्यटन विकासाच्या सिंधुदुर्गातील अनेक प्रकल्पांना भरीव तरतूदही त्यांनी जाहीर केली. 

या अर्थसंकल्पात सिंधुदुर्गच्या पदरात काय पडणार, याची उत्सुकता समस्त जिल्हावासीयांना होती. काही प्रमाणात अर्थमंत्र्यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे वेंगुर्ले येथील निवती रॉकमधील पानबुडी पर्यटन प्रकल्पासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. देशाला जवळपास साडेसात हजार कि.मी.ची किनारपट्टी लागली आहे. या किनारपट्टीवरील पहिला बॅटरीवरील पानबुडीचा पर्यटन प्रकल्प वेंगुर्ले-निवती रॉक येथे होणार आहे. सिंधुदुर्गात यापूर्वीच तारकर्ली येथे स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग हा उपक्रम राबविला जात आहे. आता पानबुडी प्रकल्पामुळे देखील समुद्र विश्‍वाचे दर्शन पर्यटकांना होणार आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाच्या पायाभूत सुविधांसाठी 9 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यास संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याच्या संवर्धनासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.