देवरुख : वार्ताहर
शेतात कोणी नसताना आग लागली तर बहुसंख्यवेळा शेती जळून नष्ट होते. कारण शेती ही घरापासून दूर असते. त्यामुळे आग लागलेली लवकर समजत नाही. मात्र, लागलेली आग शेतकर्याला कुठेही असताना समजावी व ती आटोक्यात आणता यावी, यासाठी अभिनव अशा यंत्राची निर्मिती संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. लक्ष्मण नाईक यांनी केली आहे. शेतात आग लागली तर अलार्म वाजेलच, पण शेतकर्याच्या मोबाईलवर मेसेजही येईल. तसेच ही आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याची यंत्रणा सुरु होणार आहे. हे यंत्र शेतकर्यांना वरदान ठरणार आहे.
सध्या वणव्यांचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. काही वेळा या आगीत पूर्णपणे शेतातील पिके नष्ट होत आहेत. त्यामुळे शेतकरी सध्या चांगलेच हतबल झाले आहेत. बहुसंख्य शेतीही घरापासून दूर असल्याने रात्री किंवा दिवसाही आग लागलेली शेतकर्याला समजत नाही. त्यामुळे आग लागलेली असताना शेतकरी काहीच करु शकत नाही. मात्र, यावर आता आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. लक्ष्मण नाईक यांनी अफलातून असा उपाय काढला आहे. त्यासाठी एका यंत्राची निर्मिती केली असून विशेष म्हणजे याची दखल मुंबई विद्यापीठाने घेतली आहे.
शेतात जर आग लागली तर या यंत्राद्वारे प्रथम अलार्म वाजणार आहे. तसेच शेतकर्याच्या मोबाईलवर मेसेजही जाणार आहे. त्यामुळे शेतात ठिबक सिंचनसारखी यंत्रणा त्वरित सुरु करता येणार आहे. जेणेकरुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे शेतकर्याला हे यंत्र वरदान ठरणार आहे. हे यंत्र बहुद्देशीय असून याचा शेतकर्यांना अनेक गोष्टींसाठी फायदा होणार आहे. शेतात जमिनीचा ओलावा संपला तर त्वरित ठिबक सिंचन यंत्रणा सुरु होणार आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय थांबणार आहे. विशेष म्हणजे ही यंत्रणा मनुष्यविरहित चालू शकते.
तंत्रज्ञानाच्या युगात शेतकर्यांना या यंत्राचा लाभ व्हावा व त्यांचे जीवनमान उंचावले जावे, त्यासाठी याची निर्मिती केल्याचे प्रा. लक्ष्मण नाईक यांनी सांगितले. यासाठी संस्थाध्यक्ष रवींद्र माने व महाविद्यालयाचे प्राचार्य महेश भागवत यांचे मार्गदर्शन लाभल्याचे नाईक यांनी सांगितले. याचबरोबर गॅस गळतीबाबत सूचित करणारे यंत्रही त्यांनी विकसित केले आहे.
विद्यापीठाकडून मिळणार अनुदान
मुंबई विद्यापीठातर्फे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये अत्याधुनिक संशोधनाला चालना मिळावी, या उद्देशाने विविध संशोधन प्रकल्पांची दरवर्षी निवड करण्यात येते. या वर्षी प्रा. लक्ष्मण नाईक यांच्या या प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाला विद्यापीठातर्फे अनुदानाची घोषणाही करण्यात आली आहे.