Thu, Jul 18, 2019 01:08होमपेज › Konkan › नागरिकांनीच कशाला, पोलिसांनीही बक्षिसे मिळवावीत!

नागरिकांनीच कशाला, पोलिसांनीही बक्षिसे मिळवावीत!

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 8:21PMपरवा सावंतवाडी तालुक्यातील माडखोल-धवडकी येथे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने चार चोरटे आले आणि दागिने घेऊन लंपास झाले. माडखोल गावच्या बहाद्दूर तरुणांनी पाठलाग करून दोघांना पकडले. कोणतेही शस्त्र हातात नसताना हे धाडस दाखवले. आता पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी माडखोलमधील त्या तरुणांसाठी बक्षीस जाहीर केले आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण केवळ नागरिकांनीच जीव धोक्यात घालून हे धाडस का करावे? ज्यांचे कर्तव्य आहे अशा पोलिसांनी गेले सहा महिने सिंधुदुर्गात धुमाकूळ घालणार्‍या चोरट्यांना असे पकडून बक्षिसे का नाही मिळवलीत? असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. पोलिस काही करू शकणार नाहीत, हे लक्षात आल्यावर अलिकडे सिंधुदुर्गवासीय सावध झाले आहेत. बंगले फोडले जातात पण चोरट्यांच्या हाती काही लागत नाही. लोक बंगल्यात आता दागदागिने ठेवतच नाहीत. म्हणून तर चोरट्यांनी आता ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला आहे.

9 मे रोजी सावंतवाडी तालुक्यातील मडुरा-परबवाडीत राहणार्‍या शर्मिला शिरोडकर यांच्या घरात दोन अनोळखी भामटे शिरले. भर दुपारी 12 वा. च्या सुमारास मोटारसायकलने आलेल्या दोघांनी दागिने पॉलिश करून देतो असे सांगितले. शिरोडकर यांनी मंगळसूत्र आणि चेन पॉलिशसाठी दिलीदेखील. पॉलिश करून डबी हातात दिली आणि अर्ध्या तासाने डबी उघडा असे सांगून चोरटे पसार झाले. मग कळले डबी रिकामी होती. दागिने गमावल्याचे लक्षात आल्यानंतर शिरोडकर यांना जबर मानसिक धक्‍का बसला. त्या जमिनीवर कोसळल्या. मग शेजारी-पाजार्‍यांनी व नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. आणखी तीन दिवसांनीच सावंतवाडी तालुक्यातील माडखोल-धवडकी येथे असाच प्रकार घडला. धवडकी येथे राहणार्‍या जयश्री राऊळ यांचे दागिने चोरट्यांनी दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने पळविले.

जयश्री राऊळ यांनी जागृकता दाखवत याची माहिती इतरांना दिली. मग चोरट्यांचा पाठलाग सुरू झाला, आंबोलीतील पोलिसांनाही कळविले. पण ते त्यांना पकडू शकले नाहीत. शेवटी निखिल सावंत, पंकज राणे, अनिल परब, दत्ताराम देसाई या चार तरुणांनी आजरा फाटा येथे चोरट्यांना गाठले. दोघेही बिहारचे होते. त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. या धाडसाबद्दल आता पोलिस खाते या चौघांना गौरविणार आहे. खरेतर पोलिस खात्याचे ते कर्तव्यच आहे, पण स्वतः चोरट्यांना पकडण्याचे कर्तव्य पोलिस केव्हा पार पाडणार? हा खरा प्रश्‍न आहे. गेले सहा महिने चोरट्यांचा धुमाकूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे. एक काळ असा होता, केवळ रात्रीच्या चोर्‍या व्हायच्या. आता दिवसाच्या होऊ लागल्या आहेत. एकावेळी चार-चार बंगले  फोडले जातात.

दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने दागिने लंपास करणारे गुन्हे गेली अनेक वर्षे घडत आहेत. मोटारसायकलवरून हे चोरटे येतात, एखाद्या गावात जातात आणि गोड बोलून दागिने पॉलिशसाठी घेतात. हे खरे आहे की नेहमी वृत्तपत्रांमध्ये अशा गुन्ह्यांच्या बातम्या येऊनही ग्रामीण भागातील महिला दागिने पॉलिशसाठी देतात. यात केवळ त्या महिलांना दोष देण्यापेक्षा पोलिसांचे काही कर्तव्य आहे की नाही? या प्रश्‍नाचे उत्तर होय असेच असेल. आज गावागावात अनेकजण फिरते विक्रेते असतात. छोट्याशा गावातही दर आठवड्यातून एकदा-दोनदा चादरी विकणारे परप्रांतीय येतात. या छोट्या गावांमध्ये एवढा धंदा होऊ शकतो का? हा प्रश्‍न पोलिसांनी कधीतरी या फिरत्या विक्रेत्यांना विचारायला हवा. व्यापार करण्याचे स्वातंत्र्य जरुर आहे, परंतु  त्यासंदर्भात सतर्क राहून गुन्हेगारांना शोधून काढण्याची जबाबदारी पोलिसांचीही आहे. 

अनेकवेळा पोलिस बाहेरून आलेल्या पर्यटकांची कसून चौकशी करतात, गाड्यांची तपासणी करतात. त्यामुळे पर्यटकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. लोकप्रतिनिधी  सभांमध्ये हा मुद्दा उपस्थित करतात, तरीदेखील या तपासण्या थांबलेल्या नाहीत. अशा तपासण्या करणे गरजेचेच आहे. परंतु वर्षानुवर्षे तपासण्या सुरू असताना एकही गुन्हेगार किंवा चोरटा तपासणी करताना पोलिसांच्या हाती का लागत नाही? केवळ गोवा बनावटीची दारू पकडणे आणि ड्रायव्हिंग लायसन्सची तपासणी एवढेच काम पोलिसांचे असेल तर मग चोर कसे सापडणार? हे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न आहेत. जेव्हा रस्त्यावरच्या पोलिसांकडून होणार्‍या तपासण्या वाढल्या जातात तेव्हा अशा कारवायांचे टार्गेट पोलिसांना दिले जाते अशी माहिती मिळते. पोलिस खाते शासनाचा महसूल गोळा करण्यासाठी आहे की जनतेचे संरक्षण करण्यासाठी आहे? असा प्रश्‍न उपस्थित केला जातो.