Tue, Apr 23, 2019 23:53होमपेज › Konkan › गुहागरात आज कोणाला लॉटरी लागणार?

गुहागरात आज कोणाला लॉटरी लागणार?

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 11 2018 9:30PMगिमवी : वार्ताहर

गुहागर  नगर पंचायतीच्या निवडणुकीचा निकाल 12 एप्रिल रोजी लागणार असून ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम मानण्यात येत आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आ. भास्कर जाधव यांच्यासाठी हा निकाल प्रतिष्ठेचा आहे. दुसर्‍या बाजूला शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख सचिन कदम याचे नाव चर्चेत आहे. भाजपचे डॉ. विनय नातू यांच्यासाठी गुहागरचा निकाल महत्त्वपूर्ण आहे. शिवाय नगराध्यक्षपदाचे उमेदवार व शहर विकास आघाडीर्चेे राजेश बेंडल यांच्यासाठी निवडणूक महत्त्वाची असून निवडणूक निकालात कोणाला लॉटरी लागणार हे बारा तारखेलाच ठरणार आहे.
जो उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान होईल त्याचे राजकीय भविष्य हे निश्‍चितच उज्ज्वल असणार आहे. गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होत असून 17 प्रभागांमधून 47 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी विद्यमान सताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक कनगुटकर भाजपकडून रवींद्र बागकर तर शहर विकास आघाडीकडून माजी सभापती राजेश बेंडल  रिंगणात आहेत.

गुहागर नगरपंचायतीची ही निवडणूक खर्‍या अर्थाने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात होण्यासारखी चिन्हे असताना शहर विकास आघाडीने यात रंगत आणली आहे. यामुळे सर्वच  राजकीय पक्षांना गणिते जुळविताना राजकीय भविष्य पणाला लागले आहे. या सर्वामुळे कोणाचा विजय तर कोणाचा पराजय हे शहर विकास आघाडीच ठरविणार असल्याचे दिसते. शहर विकास आघाडीचा समान फटका  अनेक उमेदवारांना बसण्याची चिन्हे आहेत.

कुणबी  समाजाने शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याने अनपेक्षित चमत्कार घडणार तर नाही ना, अशीही चर्चा आहे. निवडणूक निकाल काहीही लागला तरी त्याचे दूरगामी परिणाम भाजप तसेच राष्ट्रवादीला सहन करावे लागणार आहेत. त्यातच गुहागर हा आ. भास्कर जाधव यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप व शिवसेना आपला आपला मतदार राखण्यात यशस्वी होतात का, याची चर्चा आता रंगू लागली आहे तर आता गुहागरमधील जनता  निकालात कोणाला कौल देतात तर कोणाचा ‘निकाल’ लावतात आणि बारा तारखेला कोणाला लॉटरी लागणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags : Konkan, Who, win, Guhagar, today