Tue, May 21, 2019 18:33होमपेज › Konkan › कणकवलीचे नवे कारभारी कोण?

कणकवलीचे नवे कारभारी कोण?

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 11 2018 10:26PMकणकवली : प्रतिनिधी

कणकवली नगरपंचायतीच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल गुरूवार 12 एप्रिल रोजी लागणार असून कणकवलीचे नवे कारभारी कोण? याचा फैसला होणार आहे. या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीविरूध्द महाराष्ट्र स्वाभिमान यांच्यातच कडवी लढत झाली. अर्थात कणकवली विकास आघाडीची मतेही निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे  या निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसह सत्तेच्या खुर्चीवर कोण विराजमान होतो? याची उत्सुकता अवघ्या कणकवलीलाच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला आहे. 

कणकवली  नगराध्यक्षपदासाठी युतीतर्फे संदेश पारकर, महाराष्ट्र स्वाभिमान-राष्ट्रवादी आघाडीतर्फे समीर नलावडे, काँग्रेसतर्फे विलास कोरगांवकर आणि कणकवली विकास आघाडीतर्फे राकेश राणे असे चार उमेदवार रिंगणात होते. या चारही उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला गुरूवारी होणार आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने नगराध्यक्षपदासह 14 जागांवर युती केली तर 4 जागांवर मैत्रीपूर्ण लढत दिली. तर स्वाभिमानने नगराध्यक्ष पदासह 17 जागा लढविल्या आणि एका जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार उभा करून राष्ट्रवादीशी आघाडी केली. या निवडणुकीत प्रथमच कणकवली गावविकास आघाडीने प्रस्थापित राजकीय पक्षांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. नगराध्यक्षपदासह 9 जागा या आघाडीने लढविल्या. तर काँग्रेसने नगराध्यक्षपदासह 10 जागा लढविल्या. 

कणकवली नगरपंतचायतीच्या या निवडणुकीत मतदारांनीही उत्स्फूर्तपणे जवळपास 77 ते 80 टक्के एवढे मतदान झाले.  या निवडणूकीचे एकंदरीत चित्र पाहता खरी लढत झाली ती महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विरूध्द भाजप-शिवसेना युती यांच्यातच.  त्यामुळे नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या अनेक जागांवर या दोघांतच घासाघीस होणार आहे. अर्थात कणकवली विकास आघाडी किती मते घेते यावरही बरीचशी गणिते अवलंबून आहेत. या गाव विकास आघाडीने देखील काही प्रभागांत प्रस्थापितांना कडवी लढत दिल्याचे चित्र आहे. तसेच मराठा फॅक्टरचा लाभ गाव विकास आघाडीला कितपत होतो, यावरही या आघाडीच्या उमेदवारांचे यशापयश अवलंबून आहे. 

Tags : Konkan, Who,new, steward, Kankavli