Sat, Dec 14, 2019 02:58होमपेज › Konkan › लाच घेताना शाखा अभियंत्यासह उपअभियंत्याला रंगेहाथ पकडले

लाच घेताना शाखा अभियंत्यासह उपअभियंत्याला रंगेहाथ पकडले

Published On: Dec 04 2018 1:30AM | Last Updated: Dec 03 2018 11:19PMदेवरुख : विशेष प्रतिनिधी

संगमेश्‍वर तालुक्यातील वांझोळे येथील दोन पाखाड्यांचे बिल काढण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग देवरुख येथील उपअभियंता बाळासाहेब धोंडिराम साळवी (वय 57) आणि शाखा अभियंता शेखर रूद्राप्पा माळाई (56) यांना लाचलुचपत प्रतिबंधक उपविभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले. सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी एका ठेकेदाराने 14 व्या वित्त आयोगांतर्गत वांझोळे येथे दोन पाखाड्यांचे काम केले. यातील एक काम 40 हजारांचे तर दुसरे काम 90 हजार रुपयांचे होते. पाखाड्या झाल्यानंतर हा ठेकेदार बिल मिळण्यासाठी अभियंत्यांना विनंती करीत होता. हे बिल काढण्यासाठी दोन्ही अभियंत्यांना सहा हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आले. आधीच छोटे काम, त्यात लाच मागण्यात आली. त्याशिवाय बिल काढले जात नव्हते. त्यामुळे त्या ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

ठेकेदाराच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागितली असल्याबाबत खात्री करून घेतली. साळवी याने 1500 तर माळाई याला 3500 रुपये घेताना जि. प. बांधकाम उपविभाग 
देवरुख येथील कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक राजेंद्र रानमाळे, पोलिस निरीक्षक प्रवीण कदम, पोलिस हवालदार संदीप ओगले, पोलिस नाईक विशाल नलावडे, पोलिस शिपाई हेमंत पवार, दीपक आंबेकर यांनी केली.