Tue, Jul 16, 2019 10:20होमपेज › Konkan › महामार्गावरील खड्ड्यांतून स्वातंत्र्य कधी मिळणार?

महामार्गावरील खड्ड्यांतून स्वातंत्र्य कधी मिळणार?

Published On: Aug 16 2018 10:51PM | Last Updated: Aug 16 2018 9:01PMनांदगाव : वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गावर तळगाव ते कलमठ टप्यात पडलेल्या खड्डयातून स्वातंत्र कधी मिळणार? असा प्रश्‍न पडत असून गेल्या दोन वर्षाची परिस्थिती पाहता आज चौपदरीकरण होतानाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.शासन स्तरावर अनेक बैठका झाल्या,आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. मात्र, सत्ताधारी व विरोधक नागरिकांच्या या समस्या सोडवण्यास अपयशी ठरल्याचे दिसत आहे.गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील खड्डे बुजवा,असा फतवा शासन काढत आहे. मात्र, कामाचा दर्जा पाहता बुजविलेले खड्डे गणेशोत्सवापर्यंत तरी टिकणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

हुंबरठ येथे सिमेंट काँक्रिटने डायव्हर्शन भागाचे काम केलेले आहे. यामुळे येथील नागरिकांना  थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र बेळणे, नांदगाव, असलदे, कासार्डे, तळेरे, खारेपाटण भागात जुना रस्ता व डायव्हर्शन भाग मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाला आहे. आज अनेक समस्या असताना ठेकेदार कंपनी व हायवे प्राधिकरण अधिकारी कोणताही ठोस निर्णय घेताना दिसत नाहीत.सत्ताधारी व विरोधक फक्‍त बैठका व इशारा देत आहेत.मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली किंवा नाही याबाबत माहिती घेताना दिसत नाही. 

मुंबईत झालेल्या बैठकीत गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र गणेशोत्सवाला काही अवधी शिल्लक  आहे.तत्पुर्वी जून,जुलै,ऑगस्ट  महिन्यात सामान्य नागरिक व वाहनचालक यांनी मोठ्या जिकरीने या खड्डेमय मार्गातून प्रवास केला आहे.आता तरी तत्काळ सिंमेट-काँक्रीटने किंवा डांबरीकरणाने खड्डे बुजवा, अशी मागणी नागरिक व वाहनचालक करत आहेत.