Wed, Jul 17, 2019 18:19होमपेज › Konkan › खेड रेल्वे स्थानकात बॉम्ब शोध पथक येते तेव्हा...

खेड रेल्वे स्थानकात बॉम्ब शोध पथक येते तेव्हा...

Published On: Jun 07 2018 2:06AM | Last Updated: Jun 06 2018 8:50PMखेड : प्रतिनिधी

तालुक्यातील खेड रेल्वे स्थानक परिसरात मंगळवार दि.5 रोजी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास अचानकपणे पोलिस अधिकारी, कर्मचारी, राखीव पोलिस दलाची तुकडी, श्‍वानपथक, बॉम्ब डिस्पोजल पथक, पालिकेचा अग्निशामक बंब दाखल झाल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.स्थानकात गाडीची वाट पाहत थांबलेल्या प्रवाशांच्या साहित्याची तपासणी करत पोलिस अधिकारी, कर्मचारी, श्‍वान पथकाने स्थानकाचा ताबा घेतला आणि सुमारे एक तास स्थानकात कसून चौकशी केली. मात्र, यानंतर हा प्रकार आपत्कालीन व्यवस्थापनाची चाचणी असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले.

खेड रेल्वे स्थानकात मंगळवार दि.5 रोजी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे प्रवासी गाडीची वाट पाहत थांबले होते. स्थानकाबाहेर रिक्षा चालक देखील प्रवाशांची ने-आण करण्यासाठी थांबले होते. परंतु, काही काळातच पोलिस निरीक्षक अनिल गंभीर यांच्या नेतृत्वाखाली खेड पोलिस ठाण्यातील 7 अधिकारी, 18 कर्मचारी, राखीव पोलिस दलाची एक तुकडी रेल्वे स्थानक परिसरात पोहोचली. शिस्तबद्धपणे रेल्वे स्थानकासमोर अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपापल्या जागा घेतल्या. रत्नागिरी येथील श्‍वान अ‍ॅलेक्स पथकातील एक अधिकारी व पाच कर्मचार्‍यांसह खेड रेल्वेस्थानक परिसरात आले.या पथकाने सोबत बॉम्ब शोधण्यासाठी लागणारी सर्व आधुनिक यंत्रणा आणली होती.  श्‍वान पथक दाखल झाल्यानंतर काही काळातच सर्व यंत्रणेने रेल्वे स्थानकाचा ताबा घेतला. पोलिस निरीक्षक अनिल गंभीर, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत लाड, वर्षा शिंदे, पोळेकर आदींच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचार्‍यांनी स्थानकाच्या विविध भागांची तपासणी केली.