Wed, Apr 24, 2019 11:30होमपेज › Konkan › जुन्या चलनी नोटांमागचे गौडबंगाल काय?

जुन्या चलनी नोटांमागचे गौडबंगाल काय?

Published On: Aug 23 2018 10:53PM | Last Updated: Aug 23 2018 10:35PMसावंतवाडी : हरिश्‍चंद्र पवार 

सध्या सावंतवाडी तालुक्यामध्ये  चलनातून बाद झालेल्या  जुन्या  हजार - पाचशे रुपयांच्या चलनी  नोटांच्या बंडलांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. अलिकडेच एक कोटीहून अधिक रक्कमेच्या जुन्या नोटा वाहतूक करताना आढळल्या. रद्दीत जमा झालेल्या या नोटांचा पुन्हा वावर होण्याचे कारण काय? या मागचा म्होरक्या कोण? या नोटा नेमक्या कशासाठी आणल्या जातात? त्या नोटांचे पुढे काय केले जाते? हे प्रश्‍न अनुत्तरीतच आहेत. या जुन्या नोटा नव्या चलनामध्ये कशा काय परावर्तीत होणार हा सर्वसामान्यांसाठी  प्रश्‍नच आहे. या प्रश्‍नाची उकल पोलिसांनी करुन सत्य जनतेसमोर ठेवावे, अशी माफक अपेक्षा आहे. यामागे गोवा कनेक्शन आहे का? याचाही उलगडा होणे गरजेचे आहे. 

काळा  पैसा काय असतो? तो कसा मिळतो? यामध्ये जनतेला स्वारस्य नसले तरी हा पैसा वेळीच बँक अथवा रिझर्व बँकेच्या खात्यात जमा झाला असता तर तो देशाच्या पर्यायाने जनतेच्या कामी आला असता.सुमारे 1 कोटी रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कुठल्या बँकेत जमा करता येणार नाही किंवा  कुठल्याही  देशात जाऊन या काळ्या पैशाचे रूपांतर व्हॉईट पैशात होणार कसे?  याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका रात्रीत अध्यादेश जारी करून पाचशे आणि हजार रुपयांच्या चलनातील नोटा बाद ठरविल्या होत्या. त्यानंतर या नोटा बदलून घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकात  जनतेच्या रांगा लागल्या होत्या. नोटा बंदीमुळे देशामध्ये मोठी हलचल निर्माण झाली होती. एटीएममध्ये खडखडाट आणि बँकांमध्ये  नव्या नोटांचा तुटवडा अशी आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.  जुन्या चलनातून बाद झालेल्या नोटा बदलण्यासाठी नागरिक, छोटे-मोठे व्यापारी ते धनाढ्य सावकारापर्यंत सर्वांनी बँकेसमोर रांगा लावल्या होत्या. त्यानंतर अचानक मोदी सरकारने या नोटा बँकेतून बदलण्याची अंतिम मुदतही संपली. या नोटा फक्त रिझर्व बँकेच्या शाखांमधून बदलून  घेण्याचा अध्यादेश जारी केला.  काही कालावधीनंतर  या नोटा बदलून मिळणार नाहीत, असाही अध्यादेश जारी केला होता. 

राज्यात किंवा देशात कुठेही नोटा बदलून घेण्याची डेडलाईन संपल्यानंतर कचर्‍याच्या ढिगार्‍यात  किंवा  नदीपात्रामध्ये जुन्या नोटा फेकण्यात आल्या. मुंबई, पुण्यासारख्या बड्या शहरात या नोटा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जप्तही केल्या होत्या. या सर्व घटनांना एक वर्ष पूर्ण होऊनही  चलनातून बाद झालेल्या नोटांची बंडले पुन्हा आढळून येत असल्याबद्दल सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातून शहराकडे या नोटांची बंडले आणली जात आहेत.

अल्प कमिशनच्या लोभापायी या नोटा गोळा करुन त्यांवर 25 टक्के रक्कम देणे व कमिशन मिळविण्याकडे ग्रामीण भागातील तरुणांचा वाढता कल पाहता हा प्रकार चिंताजनक आहे. क्राईमचे नवनवीन प्रकार सिंधुदुर्गात येऊ लागल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे एक करोड रुपयांच्या बदल्यात पंचवीस लाख रुपये नव्या चलनातील नोटा संबधित आरोपींना दिल्या जाणार होत्या. हे कसे याबद्दलची उत्सुकता कायम आहे.  

सिंधुदुर्ग जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मिळालेल्या माहितीवरून बोगस गिर्‍हाईक बनवून या नोटा हस्तगत केल्या. परंतु यातील मुख्य सूत्रधार अजूनही पोलिसांच्या हाती सापडलेला नाही. तो या नोटा नेमक्या कुणाला देत होता, कुठून आणत होता, पूर्वी त्याने किती वेळा अशा नोटा बदलून घेतल्या या सर्वाची उकल होणे गरजेचे आहे. प्रथमदर्शनी विजय परब नामक ही व्यक्ती मुख्य सूत्रधार असल्याचे पुढे आले तरी यामागे बडी व्यक्ती असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या व्यक्तीचा शोध पोलिसांनी घेण्याची गरज आहे. 

गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या सावंतवाडी  तालुक्यातून या जुन्या नोटांचा पुरवठा करण्यात आल्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे गोवा राज्याशी जोडले गेले आहेत काय? याचा तपास होण्याची गरज आहे. या प्रकरणातील विजय परब आणि शंभा भिंगी यांचे नेमके काय कनेक्शन आहे हे शोधण्याची गरज आहे. 

एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा  या नव्या नोटांत रुपांतरीत करण्यासाठी सावंतवाडीत  आणलेल्या जुन्या नोटा कणकवलीपर्यंत दिल्या जाणार होत्या. हा पैसा   कणकवलीमध्ये नेमका कुणाकडे दिला जाणार होता. याचा शोध घेण्याची गरज आहे. मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी जुन्या नोटांचे  लोण आता सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत येऊन ठेपल्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्याची गरज निर्माण झाली आहे 

चलनातून हद्दपार झालेल्या नोटांमागचे  सत्य काय?

राज्यासह देशभरातील जिल्हा बँका आणि सहकारी पतसंस्थांनी जमा केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या नोटा राष्ट्रीयकृत बँका आणि जर रिझर्व बँकांना जमा करून घेण्यास केंद्र शासनाने आडकाठी  निर्माण केली आहे. याविरोधात या सहकारी संस्था सरकार विरोधात न्यायालयामध्ये गेल्या आहेत. हा खटला न्यायप्रविष्ट असून या जुन्या नोटांचे पुढे काय करायचे? हा प्रश्‍न या सहकारी बँका आणि पतसंस्थांना पडला आहे. तसेच नेपाळ किंवा देशाच्या शेजारील राष्ट्रांमधून या जुन्या चलनातून बाद झालेल्या नोटा करन्सी चेंज करून त्या-त्या देशातील चलनामध्ये  परावर्तीत करता येतात काय? याचाही उहापोह होण्याची गरज आहे. याबाबतही ठोस पुरावा अथवा माहिती जनतेसमोर यायला हवी आहे.