Mon, Jan 20, 2020 14:58होमपेज › Konkan › वेंगुर्लेतील सुसज्ज मच्छीमार्केट कधी उभे राहणार?

वेंगुर्लेतील सुसज्ज मच्छीमार्केट कधी उभे राहणार?

Published On: Mar 04 2018 1:42AM | Last Updated: Mar 03 2018 8:58PMवेंगुर्ले : नागेश पाटील

वेंगुर्ले शहरातील रखडलेले मच्छी मार्केट पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. या मार्केटसाठी मंजूर झालेला पावणे तीन कोटी रुपयांचा निधी माघारी जाण्याची दाट शक्यता असताना अजूनही या कामाला सुरवात झालेली नाही. वेंगुर्ले शहरात अद्ययावत मच्छी मार्केटसाठी उभारण्यासाठी मंजूर हा निधी गेली तीन वर्षे वापराविना पडून आहे.या कामात स्थानिक पातळीवर नाहक राजकारण केले जात असल्याने  हे मार्केट उभारण्यास अडचणी येत आहेत.

वेंगुर्ले नगरपरिषदेचे अद्ययावत मच्छीमार्केट मंजूर होऊन त्यासाठी मत्स्य महामंडळ  व  जिल्हा नियोजन मधून मिळून 2 कोटी 15 लाख 79 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. सध्या अस्तित्वात असलेले क्रॉफर्ड मार्केटची इमारत निर्लेखित करून व बाजारपेठेतील पालिकेच्या मालकीचे  दुकान गाळे हटवून त्या ठिकाणी हे सुसज्ज मच्छी मार्केट उभारण्याचा पालिकेचा मनोदय होता. या मार्केट उभारण्याच्या कामाला तत्कालीन न. प. बॉडीने मंजुरी दिली होती. त्यानंतर वेंगुर्ले न. प. च्या  सत्तेत आलेल्या बॉडीने मच्छीमार्केटचे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांना काही प्रमाणात यश ही आले, मात्र दुकानगाळे धारकांनी तसेच जमीन मालकांनी त्याला विरोध दर्शवत त्यांनी न्यायालयात हरकत नोंदवली. परिणामी पुन्हा काही काळ या मार्केटचे काम रखडलेले. 

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गेल्या वर्षी या मार्केटचे भूमिपूजन झालेे. याला वर्षे पूर्ण होत आले तरीही अद्याप या कामाला सुरवात झालेली नाही. मध्यंतरी नगराध्यक्ष दिलीप गिरप व सहकारी नगरसेवकांनी या संदर्भातील  दुकानगाळेधारक तसेच जमीनमालकांची  बैठक घेत यावर तोडगा काढण्याचा प्रयन्त केला. त्यावेळी महिनाभरात या मार्केटचे काम सुरू होईल. अशी अशा  होती. मात्र, प्रत्यक्षात या प्रकल्पात काडीमात्र प्रगती झालेली नाही. नुकताच झालेल्या  पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत मच्छिमार्केटचे काम कधी सुरू करणार? असा सवाल केला. यासाठी मंजूर निधी परत जाणार असल्याने  नगराध्यक्षांनी वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी करत, हे पाप कोणाचे आहे  ते लोकांसमोर येऊ द्या, असे खडे बोल सुनावले होते. 

मच्छीमार्केट  कामाला सुरवात न झाल्यामुळे मच्छी व्यवसायिकांना भर उन्हात  बसून मासे विक्री करावी लागत आहे. त्यांना तात्पुरती शेड बांधून देण्याचा ठराव पालिकेने घेतला असला तरी मूळात मंजूर झालेले मार्केट कधी पूर्ण होणार? असा सवाल आहे. अद्ययावत मच्छी मार्केट बांधण्यास आपण समर्थ आहोत, असे सांगणार्‍या लोकप्रतिनिधी व प्रशासनास वेंगुर्लेवासियांकडून वारंवार निवेदने दिली जातात. त्यावर प्रत्येक वेळी महिन्यात काम सुरू होणार असल्याची आश्‍वासने मिळतात. परंतु हे काम मूर्त स्वरूपात कधी येणार या बद्दल बोलण्यास लोकप्रतिनिधी किंवा  पालिकेचे प्रशासकीय अधिकारी तयार नाहीत.

स्वच्छ शहरातील विविध समस्या गंभीर

स्वच्छतेत अग्रेसर म्हणून राज्यस्तरावर नावलौकिक मिळविलेल्या वेंगुर्ले नगरपरिषदेस अजूनही अद्ययावत मच्छी मार्केट,वाहनतळ,अरुंद रस्ते आदी  ज्वलंत प्रश्‍न भेडसावत आहेत. ते सोडविण्याचा प्रशासना समोर पेच आहे.त्यात व्यक्‍तिगत हेवेदावे ,राजकारण अशा विविध अंतर्गत कारणाने वेंगुर्लेच्या विकासाला नेहमीच खिळ बसली आहे.विकासात्मक उपक्रम राबविताना नागरिकांना विचारात न घेता काम चालू करणे ,काम चालू असताना अर्धवट अवस्थेत ते काम बंद पाडणे हे नेहमीचे समीकरण बनले आहे.याचा सर्वाधिक फटका सर्व सामान्य नागरिकांना बसतो.  

सद्य परिस्थितीत पर्यायी जागा म्हणून मच्छी विक्रेत्या बसत असलेल्या जागेचा रविवारच्या आठवडा बाजारात बाहेरील व्यापारी आश्रय घेतात.आधीच पर्यायी जागा कमी पडत असलेले मच्छी विक्रेते मग लौकिक हॉटेल समोरील रस्त्याच्या कडेचा आश्रय घेतात.आधीच अरुंद असलेला हा मार्ग मगे वाहतूक कोंडीस निमंत्रण देतो. बाजारपेठेत वाहतूक पोलिस नसल्याने वाहनचालक  व ग्राहकांची मात्र पुरती दमक्षाक होते. जोपर्यंत मच्छीमार्केट अद्ययावत होत नाही तोपर्यंत वाहनतळ तसेच वाढती वाहतूक कोंडीसारख्या समस्या कायम राहणार आहेत.