Fri, May 24, 2019 20:32होमपेज › Konkan › नाणार रिफायनरीबाबत आम्हाला चर्चा नकोच : नितेश राणे

नाणार रिफायनरीबाबत आम्हाला चर्चा नकोच : नितेश राणे

Published On: Aug 19 2018 11:05PM | Last Updated: Aug 19 2018 10:55PM देवगड ः प्रतिनिधी

 एकीकडे जनता मायबाप त्यामुळे जनतेवर कारवाई करू नका, असे पोलिसांना आवाहन करायचे व दुसरीकडे सामान्य जनतेवर गुन्हे दाखल करायचे अशाप्रकारचे घाणेरडे राजकारण प्रमोद जठार व त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे. या पूर्वी  श्री. जठार यांना पोपटाची उपमा दिली जात होती आता सरड्याची उपमा देण्याची वेळ आली आहे, असा घणाघात आ. नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपा व शिवसेनेने रिफायनरी प्रकल्प रद्द करावा तोपर्यंत आम्हाला प्रकल्पाबाबत आता आम्हाला कुठल्याही प्रकारची  चर्चा नको अशी भुमिका तेथील जनतेने घेतली  असल्याचेे नितेश राणे यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या देवगड कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आ. नितेश राणे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्याबरोबर शिवसेनेवर निशाणा साधला. तालुकाध्यक्ष डॉ.अमोल तेली, बाळा खडपे, गणपत गावकर, नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर उपस्थित होते.

आ. राणे म्हणाले, रिफायनरी प्रकल्पाबाबत उघड समर्थन करणार्‍या प्रमोद जठार यांना शनिवारी गिर्ये व रामेश्‍वर येथील जनतेनेच जागा दाखविली.लोकशाहीमध्ये हुकूमशाही चालत नाही हे एकजुटीने, ताकदीने उतरून जनतेने दाखवून दिले. त्या जनतेला आपला मानाचा मुजरा. रिफायनरीसारखा विनाशकारी प्रकल्प कोकणी माणसांवर लादू पाहत आहेत त्यांना धडा शिकविण्याचे काम एकजुटीने संघर्ष समिती, त्या भागातील सरपंच व जनतेने करून दाखविले.

आपण विजयदुर्ग व रामेश्‍वर येथे जावून माहिती घेतल्यानंतर रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणार्‍या स्थानिकांना आंदोलन करण्यापूर्वी पोलिसांचा त्रास, नोटिसा देण्यात आल्या होत्या व आंदोलन झाल्यानंतर शेकडो जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

एका बाजुला आंदोलन करणार्‍या मायबाप जनतेविरूध्द केसेस घेवू नयेत असे प्रमोद जठार, अ‍ॅड अजित गोगटे व त्यांचे सहकारी विनंती करतात तर दुसरीकडे सभापती जयश्री आडीवरेकर यांच्या माध्यमातुन आंदोलनकर्त्यां जनतेविरोधात लेखी तक्रार दिली जाते, यावरून जठारांना आता सरड्याची उपमा देण्याची वेळ आली आहे अशी टीका आ. राणे यांनी केली.

अशाप्रकारचे घाणेरडे राजकारण जठार व त्यांचे सहकारी करीत आहेत.रिफायनरी विरोधात काळे झेंडे दाखविण्यापूर्वी स्थानिक जनतेने पोलिसांना कळविले होते.लोकशाही पध्दतीने आंदोलन करणार असून दगडफेक न करता उघड समर्थन करणारे विजयदुर्ग येथे येत असल्याने त्यांच्यासमोर आम्हाला भावना व्यक्‍त करावयाचा आहेत अशी कल्पना पोलिसांना दिली होती.पोलिसांनीही प्रमोद जठार यांना संपर्क करून येथील परिस्थिती चिघळली आहे.तुम्ही विजयदुर्गामध्ये येवू नका असे सांगितले होते.मात्र, केवळ जनतेला त्रास देण्यासाठी, डिवचण्याचे काम करण्यासाठी जठार व त्यांचे सहकारी गेले, असा आरोप, आ. राणे यांनी केला.

रिफायनरी प्रकल्प व विजयदुर्ग बंदर हे दोन्ही विषय वेगवेगळे आहेत असे जठार सांगतात. मात्र रिफायनरीसाठीच विजयदुर्ग बंदर विकसित केले जाणार आहे. त्यामुळे जठार खोटे बोलत असल्याची टीका आ. राणे यांनी केली.रिफायनरी प्रकल्प रद्द करावा यासाठी आम्ही आंदोलने केली.मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली.विधीमंडळात याच विषयावरून राजदंड पळविला.त्यामुळे जठार यांनी ही माहिती प्रथम करून घ्यावी व नंतरच आम्हाला मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करा असे सल्ले द्यावेत.

यापुढे सेनेच्या उद्योगमंत्र्यांनी व भाजपा नेतेमंडळींनी सत्तेच्या माध्यूातून हा प्रकल्प रद्द करावा तोपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारची चर्चा करायची नाही, अशी भूमिका जनतेची असल्याचे आ. राणे यांनी सांगितले. 

शिवसेनेवरही हल्‍लाबोल  

रिफायनरी विरोधात स्थानिकांचे आंदोलन सुरू असताना  या प्रकल्पाला आमचा विरोध आहे अशी सांगणारी शिवसेना यावेळी बघ्याची भूमिका घेत होती याचेच आश्‍चर्य वाटते.रिफायनीला सावंतवाडीचे नगराध्यक्ष समर्थन देतात करतात तर दुसरीकडे रिफायनरी विरोधात आंदोलन करणार्‍या स्थानिकांवर गुन्हे दाखल होत असताना शिवसेनेचे गृहराज्यमंत्री गप्प का?शिवसेनेचे हे घाणेरडे राजकारण असून विनाशकारी प्रकल्प आणून कोकण भस्मसात करण्याची सुपारी भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांनी घेतली आहे असा आरोप नितेश राणे यांनी केला.शिवसेनेचा प्रकल्पाला विरोध असेल तर त्यांनी आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस मागे घ्याव्यात असे आव्हान नितेश राणे यांनी केले.प्रमोद जठार यांनी चेंबुरमध्ये झालेली दुर्घटना हा घातपात होता त्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करणार आहोत असे सांगितले, मात्र घातपात होता अशाप्रकारची कुठलीही माहिती आपल्याकडे नाही.जठारांनी ही धुळफेक कशाला करावी?तशा प्रकारच्या घटना घडू नये एवढी अपेक्षा आमची असल्याचे आ. राणे म्हणाले.