Sun, Jul 21, 2019 08:18होमपेज › Konkan ›

कणकवलीच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आमची : खा. नारायण राणे 
 

कणकवलीच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आमची : खा. नारायण राणे 
 

Published On: Apr 05 2018 12:13AM | Last Updated: Apr 05 2018 12:13AMकणकवली : वार्ताहर

कणकवलीचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण यापूर्वी काम केले. शहरातील रस्ते, उद्यान, रूग्णालय सुविधा, वाचनालये सर्व सुविधा अद्ययावत होणे आवश्यक आहे. नागरिकांना शहरात आवश्यक असलेल्या 18 प्रकारच्या नागरी सुविधा पुरविणे ही सत्ताधार्‍यांची जबाबदारी आहे. कणकवलीची सध्याची निवडणूक त्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने कणकवलीच्या विकासाची जबाबदारी आपण घेत आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी कणकवली येथील प्रचार सभेत बोलताना केले. 

कणकवली नगरपंचायतीच्या निवडणूकीची प्रचार सभा विद्यामंदीर ग्राऊंडवर झाली. यावेळी नारायण राणे बोलत होते. व्यासपिठावर माजी खा. निलेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, स्वाभिमान जिल्हाध्यक्ष दत्‍ता सामंत, समीर नलावडे, अंकुश जाधव, प्रणिता पाताडे, व्हिक्टर डान्टस, अबिद नाईक व सर्व उमेदवार उपस्थित होते.

त्यांनी यावेळी आपल्या भाषणात विरोेधी पक्षांच्या नेत्यांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, नगरपालिकांचा विकास करणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु सध्याच्या सत्ताधार्‍यांनी नगरपालिकांच्या विकासाकडे दुर्लक्ष केला. त्यामुळे शहरे अविकसीत राहिली आहेत. या शहरांचा विकास करण्याची जबाबदारी यापुढे आम्ही घेतली आहे  जिल्हयाचा सर्वांगीण विकास आपण केला, पाटबंधारे प्रकल्प मार्गी लावले त्यामुळे ऊस उत्पादन वाढले. त्याशिवाय अनेक विकास प्रकल्प राबविले असेही राणे म्हणाले. 

जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्ट्स म्हणाले, कोकणचे नेतृत्व करण्याची क्षमता नारायण राणे यांच्यातच आहे. त्यांना शरद पवार यानी सर्टिफिकेट दिले आहे. नारायण राणे व शरद पवार यांचे कौटुंबिक संबंध आहेत. राणेंच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गात विकास होऊ शकतो. शरद पवार यांच्या सूचनेनुसार आघाडीचा निर्णय आम्ही घेतला.  कणकवलीत शिवसेना-भाजपची दळभद्री युती आहे. कणकवलीला मागे ठेवण्यासाठी विरोधक एकत्र आले आहेत.

सतीश सावंत म्हणाले, शहरातील स्वतःची अनधिकृत बांधकामे वाचवण्यासाठी आ. वैभव नाईक व संदेश पारकर यांनी अभद्र युती केली आहे. 20 वर्ष पारकर यांच्याकडे सत्ता होती, पण कणकवलीचा विकास झाला नाही. सत्ता स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबासाठी वापरण्याचे पारकर यांचे धोरण आहे. संदेश पारकर यांना काँग्रेस मध्ये आल्यावर राणेंनी कोकण सिंचन महामंडळ उपाध्यक्ष पद दिले, पण त्यानी आपला कृतघ्नपणा दाखवला. 25 वर्ष कणकवली शहर मागे नेण्याचे काम पारकर कुटुंबांनी केलं आहे. राणे यांचा फोटो उतरवून त्यांचा अपमान केला, त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. 12 एप्रिलला 12 वाजता कणकवली नगरपंचायत कार्यालयात पुन्हा राणे यांचा फोटो लावणार, अभिमानाने स्वाभिमानचा झेंडा फडकविणार असे सावंत म्हणाले. 

दत्ता सामंत म्हणाले, संदेश पारकर यांना आम्ही अर्जुन समजले, स्वतंत्र लढणार अशी भाषा करणार्‍या शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी नितेश राणेंची धास्ती घेऊन युती केली. पत्रकार परिषद झाल्यानंतर मारामार्‍या करणारे उद्या नगरपंचायतमधील खुर्च्या तरी जागेवर ठेवणार का? विनायक राऊत यांचे रिचार्ज संपले आहे, म्हणून टॉवरना रेंज मिळत नाही. येत्या लोकसभेत नीलेश राणे नावाचं रिचार्ज आम्ही मारणार.  असा विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.

नीलेश राणे म्हणाले, म्हातारा न होणारा युवा नेता संदेश पारकर आहे. प्रमोद जठार समाजवादी पक्षात होते. राणे यांनी परिश्रम घेतले म्हणून त्यांना खासदारकी मिळाली. प्रमोद जठार पण भाजप मध्ये आहे, रत्नागिरीमध्ये दोन माजी आमदार होते, ते महामंडळासाठी इच्छुक होते, पण राणेंनी पारकर याना महामंडळ दिले. 2013 मध्ये संदेश पारकर आला, आणि राणे साहेब हरले  हा त्यांचा पायगुण. 

100 पारकर एकत्र आले तरी नितेश राणे यांना ते हरवू शकत नाही असे ही नीलेश राणे म्हणाले. आम्ही  कणकवलीचे प्रेम विसरू शकत नाही. 2019 मध्ये आम्ही तीनही राणे महत्वाच्या पदांवर असणार आहोत   राणेंचे वाईट दिवस कधी येऊ शकत नाही.  नितेश 2019 मध्ये कदाचित मंत्रीही असेही नीलेश राणे म्हणाले.