Thu, Apr 25, 2019 21:42होमपेज › Konkan › न्याय्य हक्‍कांसाठी ‘सिंधुदुर्ग बंद’ करू : राणे

न्याय्य हक्‍कांसाठी ‘सिंधुदुर्ग बंद’ करू : राणे

Published On: Feb 15 2018 10:30PM | Last Updated: Feb 15 2018 10:13PMमालवण ः प्रतिनिधी

मासेमारी व्यवसायाचे संरक्षण करण्यासाठी पारंपरिक मच्छीमार पोटतिडकीने आंदोलन, उपोषण या मार्गाचा अवलंब करून परराज्यांतील मासेमारीविरोधात लढा देत आहेत. अवैध मासेमारी रोखण्यास शासन अपयशी ठरल्याने स्थानिक मच्छीमारांनी गोवा येथील पर्ससीन नेट बोटी पकडल्या. या कारवाईत काडीचाही संबंध नसलेल्या मच्छीमार नेत्यांवर दरोडा, मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले. हा अन्याय आहे. आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी विनवणी तांडेल व नरोना  कुटुंबीयांसह येथील मच्छीमारांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांच्याजवळ केली. राणे यांनी, मच्छीमारांना संघटित लढा कायम ठेवा, मी तुमच्या पाठीशी आहे, असे सांगत याबाबत 23 व 24 फेब्रुवारी रोजी तीव्र आंदोलन करण्याचा, प्रसंगी सिंधुदुर्ग बंद करण्याचा इशारा राणे यांनी दिला.

पोलिसांनी मच्छीमारांची धरपकड सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर मच्छीमारांनी गुरुवारी  मालवण येथील नीलरत्न बंगल्यावर नारायण राणे यांची भेट घेतली.  कृष्णनाथ तांडेल, जॉन नरोना, छोटू सावजी, नितीन आंबेरकर, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, बाळू कोळंबकर, महेश जावकर, शशांक मिराशी, जि.प. उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संदेश सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, यतीन खोत, दीपलक्ष्मी पडते  व  कार्यकर्ते, मच्छीमार उपस्थित होते.

गेली अनेक वर्षे पारंपरिक मच्छीमार ट्रॉलिंग, फिशिंग, पर्ससीन नेट, परराज्यांतील हायस्पीड ट्रॉलर्स आणि आता एलईडी लाईट मासेमारी विरोधात संघर्ष करत आहेत. अतिरेकी मासेमारी रोखण्यास शासन स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री अपयशी ठरले आहेत. शासनाच्या स्पीडबोटी बंद आहेत.   यामुळे शासन अनधिकृत मासेमारी विरोधात अपयशी ठरले आहेत. शासन कोणतीही कारवाई करत नसल्याने स्थानिक मच्छीमार अवैध मासेमारीविरोधात लढा देत आहेत. या लढ्याप्रसंगी मच्छीमारांवर जिल्हा पोलिस यंत्रणा दरोडा, मारहाण यासारखे गुन्हे दाखल करून दाहशतवाद्यांसारखी वागणूक देत आहे. यामुळे आम्ही न्याय कुणाकडे मागायचा?  आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी विनंती मच्छीमारांनी नारायण राणे यांच्याकडे केली. 

 आमदार, खासदार आले कुठून ?

गेली अनेक वर्षे मच्छीमार पर्ससीन नेट, हायस्पीड ट्रॉलर व आता एलईडी लाईट मासेमारी विरोधात संघर्ष करत आहेत. मच्छीमारांना संघर्ष करताना पोलिस यंत्रणेच्या दबावाखाली काम करावे लागत आहे. असे असताना स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री मूग गिळून गप्प आहेत, अशी तक्रार श्रमिक मच्छीमार संघाचे अध्यक्ष छोटू सावजी यांनी नारायण राणे त्यांच्याकडे करताच राणे यांनी मिश्किलपणे आमदार, खासदार कुठून आले? त्यांना कोणी निवडून आणले? असा सवाल नारायण राणे यांनी केला.

‘मच्छीमारांच्या आंदोलनात आपण स्वतः उतरू’

 मच्छीमारांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर नारायण राणे यांनी मच्छीमारांनी पर्ससीन नेट, हायस्पीड ट्रॉलर व एलईडी फिशिंग याविरुद्ध सुरू केलेला लढा कायमस्वरूपी सुरू ठेवावा; पण हा लढा देताना असंघटितपणे लढू नका. अवैध मासेमारी रोखण्यास पोलिस प्रशासन व शासन सहकार्य करत नसेल तर या मासेमारीला सरकारचा पाठिंबा आहे, असे समजून मच्छीमारांच्या आंदोलनात स्वतः सहभागी होऊ, असा  इशारा नारायण राणे यांनी दिला.