Mon, Jan 27, 2020 11:05होमपेज › Konkan › पाणीटंचाई वाड्यांचे सव्वाशतक!

पाणीटंचाई वाड्यांचे सव्वाशतक!

Published On: May 22 2019 1:37AM | Last Updated: May 23 2019 1:42AM
रत्नागिरी : प्रतिनिधी

मे महिन्यात उन्हाचा दाह वाढत असतानाच पाणीटंचाईमुळे ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत. जिल्ह्यातील 67 गावांमधील 127 वाड्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या वाड्यांना 15 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील खेड तालुक्यात सर्वाधिक 24 गावांतील 44 वाड्यांत पाणीटंचाई आहे. येथे 1 शासकीय आणि 6 खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील 14 गावांतील 28 वाड्यांत पाणीटंचाई असून, एका शासकीय टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. लांजा तालुक्यात 4 गावांतील 11 वाड्यांत एक शासकीय व एक खासगी अशा दोन टँकरने पाणी पुरवण्यात येत आहे. दापोलीत 13 गावांतील 22 वाड्या गुहागरात 2 गावांतील 9 वाड्या आणि संगमेश्‍वरात 10 गावांतील 13 वाड्यांना टंचाईची झळ बसली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6 शासकीय आणि 9 खासगी टँकरमार्फत 664 फेर्‍या झाल्या आहेत. गतवर्षी 19 मे पर्यंत जिल्ह्यात 48 गावांतील 83 वाड्या तहानलेल्या होत्या. त्यावेळी 12 टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. गतआठवड्यात 53 गावांमधील 105 वाड्यांत टंचाई होती. आता या वाड्यांची संख्या 22 ने वाढली आहे.

कोकणात मुसळधार पाऊस पडत असला, तरी पाणी साठवण्याच्या योग्य उपाययोजना नसल्याने बरेचसे पाणी समुद्राला जाऊन मिळते. जमिनीत मुरलेल्या पाण्यावरच उन्हाळ्यात ग्रामस्थांची तहान भागते. गतवर्षी पावसाने एक महिना अगोदरच ‘एक्झिट’ घेतली. त्यामुळे भूजल पातळीही खालावली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या वाढणार आहे.