Sun, Dec 15, 2019 03:26होमपेज › Konkan › बोगस खताचा पुरवठा करणार्‍यांवर ‘वॉच’

बोगस खताचा पुरवठा करणार्‍यांवर ‘वॉच’

Published On: Jun 11 2019 1:21AM | Last Updated: Jun 10 2019 10:35PM
रत्नागिरी ः प्रतिनिधी

खरीप हंगाम 2019-20 साठी शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खतांचा वेळीच पुरवठा होण्यासाठी आणि बोगस खतांचा पुरवठा रोखण्यासाठी दक्षता घेतली जात आहे. त्यासाठी बी-बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या दुकाने आणि विक्रेत्या केंद्रांची तपासणी 30 जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा कृषी अधीक्षक एस. एस. जगताप यांनी केल्या आहेत. 

शेतकर्‍यांना बियाणे, खतपुरवठा, पाणी आणि वीजेची सुविधा, उत्पादित मालाला चांगला हमीभाव देऊन शेतकर्‍यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना कृषी विभागाने केल्या आहेत. शेतकर्‍याचे नुकसान होऊन हंगाम वाया जाऊ नये, यासाठी भरारी पथकांतर्फे बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या सर्व निविष्ठा दुकानांची तपासणी 30 जूनपूर्वी करण्यात येणार आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा आणि प्रधानमंत्री पीकविमा योजनेतील प्रलंबित प्रकरणांबाबत कंपनीस्तरावर पाठपुरावा करावा. पण, त्याचवेळी अपूर्ण राहिलेल्या प्रस्तावांमधील त्रुटींची पूर्तता तालुका कृषी अधिकार्‍यांनी प्राधान्याने पूर्ण करून, शेतकर्‍यांच्या वारसांना विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

कीड रोग आणि लष्करी अळी नियंत्रणा संबंधीच्या उपाययोजनांचा संभाव्य आराखडा तयार करावा,  त्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची तयारी कृषी विभागाने केली आहेत. प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र, शेती उत्पादनाची निवड करून त्याला बाजारपेठ मिळवून देऊन प्रोत्साहन देण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना आणि आवश्यक निधीची तरतूद करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

खरीप हंगाम 2019-20 चे नियोजन करण्यात आले आहे. उत्पादनामध्ये वाढ, खर्चात बचत आणि काढणीपश्‍चात व्यवस्थापन यासाठी प्रकल्प आधारित पीक प्रात्यक्षिकांचे नियोजन करण्यात आले आहे. क्रॉपसॅप संलग्न शेतीशाळा, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय कृषी विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी, केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी, कृषी उत्पादन निर्यात वृद्धी, मृद व जलसंधारण या अनुषंगाने खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे.