Sun, Jul 21, 2019 00:07होमपेज › Konkan › कुडाळ रांगणातुळसुलीतील ‘गीर गाय’ प्रकल्पावर दुबईतून ‘वॉच’

कुडाळ रांगणातुळसुलीतील ‘गीर गाय’ प्रकल्पावर दुबईतून ‘वॉच’

Published On: Dec 04 2017 1:37AM | Last Updated: Dec 03 2017 10:33PM

बुकमार्क करा

कुडाळ : प्रतिनिधी 

नोकरीनिमित्त दुबई येथे स्थायिक झालेल्या मुळ वसई पालघर येथील निरंजन विजय देसाई यांनी कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे   रांगणातुळसुली येथे ‘देसाई अ‍ॅग्रो फार्म’ची निर्मिती केली आहे. फार्ममध्ये लहान-मोठ्या  32 गीर जातीच्या गायी आहेत. या गायीच्या शेण व गोमूत्रापासून औषधे बनविण्यास त्यांनी सुरूवात केली होती. लवकरच  दुबईतील नोकरी सोडून पूर्णवेळ कुडाळ वेताळबांबर्डे येथे  गायीचे गोमूत्र व शेण यापासून  औषधाची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणार असल्याच्या मानस  निरंजन देसाई यांनी व्यक्‍त केला. विशेष म्हणजे या प्रकल्पामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याने निरंजन देसाई दुबईतून या प्रकल्पाची थेट माहिती घेतात.

कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे रांगणातुळसुली येथील गीर गायीच्या या प्रकल्पाला जि.प. उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती राजन जाधव यांनी भेट दिली. यावेळी निरंजन देसाई यांनी गीर गाईचे गोमूत्र व शेणाला किती महत्व आहे. त्यापासून  बनविलेल्या औषधांना परराष्ट्रात किती मागणी आहे. ऑरगॅनिक शेती कशी फुलते,याची सविस्तर माहिती दिली.

श्री.देसाई म्हणाले, हृदयरोग, मतिमंद व सांधेदुखी रुग्णांसाठी गीर गायीच्या  गोमूत्र व  शेणापासून  बनविलेली औषधे रामबाण उपाय आहेत, हे हेरून  यू ट्यूब वर राजू दीक्षित यांचे संभाषण आपण ऐकले. गुजरात गीरचे अध्यक्ष बी.के. आईर यांचीही भेट घेतली आणि गतवर्षी त्यांच्याकडील  15 गीर गायी वेताळबांबर्डे येथे ‘देसाई अ‍ॅग्रो फार्म’ मध्ये आणल्या. सिंधुदुर्गात गीर गायी किंवा आपल्या स्थनिक (गावठी) गायीच्या गोमूत्र  व शेणापासून औषधे तयार केल्यास त्याला मोठी मागणी आहे. देशी गायीच्या  काशिंडामध्ये सूर्यवेल नाडी असते. त्या गायींना सकाळी सूर्यप्रकाशादरम्यान  बाहेर सोडल्यास  सूर्यकिरणे त्या काशिंडावर पडतात आणि त्यानंतर  संकलित केलेले ‘गोमूत्र’  आणि ‘शेण’  औषधी असते. जिल्ह्यातील  लोकांनीही अशाप्रकारे  गायीचे संगोपन करून औषध निर्मिती केल्यास  मोठा आर्थिक फायदा होवू शकतो,असे देसाई यांनी सांगितले. जिल्ह्यात कुणी असा प्रकल्प राबविल्यास आपण त्याला आवश्यक ते सर्व मार्गदर्शन करू अशी ग्वाहीही दिली. सरपंच नागेश आईर, पं.स. सदस्य अनघा तेंडुलकर, अरविंद तेंडुलकर, संतोष कदम, सुजाता सावंत आदी उपस्थित होते.