Wed, Mar 27, 2019 06:00होमपेज › Konkan › कोंढेतील पुरातन ठेव्याला विकासाची प्रतीक्षा

कोंढेतील पुरातन ठेव्याला विकासाची प्रतीक्षा

Published On: Apr 28 2018 10:59PM | Last Updated: Apr 28 2018 10:45PMदापोली : प्रवीण शिंदे

दापोली तालुक्यातील कोंढे गावाची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झाली आहे. कोंढे टाका या ठिकाणी शिवकालीन घोडतळे असून ते वर्षानुवर्षे विकासापासून दुर्लक्षित राहिले आहे. हे तळे नामशेष होण्याच्या मार्गावर असून याच्या जतनाची गरज निर्माण झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे कोंढेकडून दाभोळ सागरी किनारी जात असत. त्यामुळे या मार्गावरील गावतळे, पन्हाळेदुर्ग आणि कोंढे या ठिकाणी लहानमोठी तळी त्यावेळी बांधण्यात आली आहेत. कोंढे येथील बांधण्यात आलेले तळे हे संपूर्ण कातळामध्ये बांधण्यात आले आहे. आजही त्यामध्ये पाणी आहे. याची खोली दहा ते बारा फूट इतकी पूर्वी होती. मात्र, दुरवस्था झाल्याने या तळ्याची उंची 2 फूटदेखील राहिली नाही. तरीही भर उन्हाळ्यामध्ये यात आजही पाणी आहे. 

या विभागामध्ये शिवकालीन आणि पांडवकालीन अशा अनेक शिल्पांचा खजिना आहे. मात्र, पुरातत्व विभागाच्या उदासीनतेने हा खजिना दुर्लक्षित राहिला आहे. या तलावांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज दाभोळकडे या मार्गे प्रस्थान करत असताना आपल्या सैन्याला आणि घोड्यांना पाणी पिण्याची व्यवस्था व्हावी म्हणून अशा तळ्यांची निर्मिती करून ठेवली होती. असे शिवकालीन तळे डागडुजी करून दुरुस्त झाले तर पाणीटंचाईच्या काळामध्ये जनावरांना आणि वेळप्रसंगी माणसांनादेखील उपयुक्‍त ठरू शकते.

कोंढेतील काही तरुणांनी गत वर्षी या तलावाची स्वच्छता केली. परंतु, पुन्हा स्थिती बिकट झाली आहे. दापोली तालुक्याला पर्यटनाची देण आहे. मात्र, दापोलीतील समुद्र किनारे हीच दापोलीच्या पर्यटनाची व्याख्या ठरली आहे. पुरातन आणि शिवकालीन असा ठेवा आजही अनेक पर्यटकांच्या द‍ृष्टीस पडलेला नाही. गावतळे येथील झोलाई, असोंडमधील माणकेश्‍वर मंदिर, पोफळवणे येथील बेळेश्‍वर, करंजाळी येथील बेळेश्‍वर, कात्रण येथील पुरातन मंदिर तर पन्हाळेदुर्गची लेणी असा असंख्य ठेवा पांडवकालीन आणि शिवकालीन आहे. मात्र, अशी अनेक मंदिरे पुरातत्व विभागाने लक्ष न दिल्याने पर्यटकांच्या द‍ृष्टीआड आहेत. तरी शासनाने याकडे लक्ष घालून या पुरातन ठेव्याला पुनर्जीवित करावे, अशी मागणी होत आहे.