Thu, Jul 18, 2019 17:00होमपेज › Konkan › ‘पदवीधर’साठी आज मतदान

‘पदवीधर’साठी आज मतदान

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 24 2018 9:55PMकणकवली : विशेष प्रतिनिधी

कोकण विभाग पदवीधर विधान परिषद मतदार संघाच्या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य सोमवारी मतपेटीत बंद होणार आहे. या मतदार संघात तब्बल 14 उमेदवार आहेत. त्यातील राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला, शिवसेनेचे संजय मोरे आणि भाजपचे अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्यातच खरी लढत होणार आहे. सोमवारी सकाळी 7 ते सायं.5 या वेळेत मतदान होणार असून जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदारांनी आपला हक्‍क बजावावा आणि आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्‍त डॉ. जगदीश पाटील यांनी केले आहे. 28 जून रोजी मतमोजणी होणार आहे. कोकण पदवीधर मतदार संघात 1 लाख 4 हजार 264 मतदार आहेत.

त्यामध्ये ठाण्यात 45 हजार 834, रायगड 19 हजार 918, पालघर 16 हजार 982, रत्नागिरी 16 हजार 222 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5 हजार 208 मतदार आहेत. कोकण विभाग पदवीधर मतदार संघात 157 मतदान केंद्रे आहेत. नोकरीत असणार्‍या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शासनाने विशेष नैमितिक रजेची तरतूद केली आहे. मतदान करण्यासाठी मतदारांना तेरा पुराव्यांपैकी एक पुरावा मतदान केंद्रावर द्यावा लागणार आहे. मतदान करण्यासाठी आवश्यक असणार्‍या पुराव्यांमध्ये पासपोर्ट, ड्रायविंग लायसन्स, पॅनकार्ड, फोटो ओळखपत्र, 31 मे पूर्वी काढलेले बँक किंवा पोस्ट ऑफिसचे फोटोसह पासबुक, छायाचित्र असलेले स्थावर मालमत्ता कागदपत्र, फोटोसह रेशन कार्ड, आधार कार्ड आदींचा समावेश आहे. मतमोजणी 28 जून रोजी नवी मुंबईतील आगरी-कोळी संस्कृती भवनात सकाळी 8 वा. पासून सुरू होणार आहे.राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपकडून जिल्ह्यात जोरदार प्रचार यंत्रणा राबवण्यात आली. आता सोमवारी या निवडणुकीचे मतदान होणार असून सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.