Thu, Jan 24, 2019 07:42होमपेज › Konkan › चिपळुणात भीमस्मारकाची तोडफोड

चिपळुणात भीमस्मारकाची तोडफोड

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चिपळूण : खास प्रतिनिधी

खेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना ताजी असतानाच चिपळूणमध्ये अज्ञातांनी मंगळवारी (दि. 27) रात्री कळंबस्ते येथील भीमस्मारकाची तोडफोड केली. यानंतर आंबेडकरी कार्यकर्त्यांनी दोन तास मुंबई-गोवा महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या तत्परतेमुळे अवघ्या दोन तासांत भीमस्मारक पुन्हा नव्याने बांधण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी अज्ञातांवर तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

शहरालगतच्या कळंबस्ते बौद्धवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गालगत जयभीम स्मारक आहे. मंगळवारी रात्रीच्यावेळी या स्मारकाची अज्ञातांकडून तोडफोड झाल्याचे येथील ग्रामस्थांच्या लक्षात आले. याबाबत चिपळूण पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेचे वृत्त समजताच तहसीलदार जीवन देसाई, पोलिस निरीक्षक इंद्रजित काटकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. वातावरण चिघळू नये याची प्रशासनाने काळजी घेत खबरदारी घेतली. खेड येथे बंदोबस्तास असलेल्या पोलिसांच्या शीघ्र कृती दलास तत्काळ चिपळुणात पाचारण करण्यात आले.

बुधवारी सकाळी 8 वा.पर्यंत ही घटना तालुक्यात समजली. तालुक्याच्या ग्रामीण भागातून समाजबांधव जमू लागले. सकाळी 9 पासून मुंबई-गोवा महामार्ग तब्बल दोन तास कार्यकर्त्यांनी अडवून धरला. परंतु, या महामार्गावरील वाहतूक पेढे येथून बायपास मार्गे वळविण्यात आली. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय थांबली.  दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी या ठिकाणी भेट दिली. तहसीलदार जीवन देसाई यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तोडफोड झालेले स्मारक तत्काळ नव्याने बांधण्याची सूचना त्यांनी केली आणि अवघ्या दोन तासांत भीमस्मारक बांधण्यात आले.  यावेळी कार्यकर्त्यांनी तहसीलदार, प्रांताधिकारी व पोलिसांना निवेदन दिले. 

Tags : 


  •