Fri, Dec 13, 2019 19:02होमपेज › Konkan › राज ठाकरे देणार रिफायनरी’ परिसराला भेट

राज ठाकरे देणार रिफायनरी’ परिसराला भेट

Published On: Dec 16 2017 1:42AM | Last Updated: Dec 16 2017 1:42AM

बुकमार्क करा

देवरूख : वार्ताहर

राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या समवेत ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच भेट घेऊन चर्चा केली. यावेळी प्रकल्पबाधित 15 गावांतील सर्वसामान्य जनतेला प्रत्यक्ष भेटून याबाबत पुढील निर्णय जाहीर करू, असे आश्‍वासन राज ठाकरे यांनी समितीच्या पदाधिकार्‍यांना दिले.

नाणार रिफायनरी प्रकल्पाला तेथील ग्रामस्थ, शेतकरी व मच्छीमारांचा तीव्र विरोध आहे. तर या प्रकल्पाच्याविरोधात संघर्ष समितीही आक्रमक झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा या समितीने घेतला आहे. या समितीच्या काही पदाधिकार्‍यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी राज ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रकल्पबाधित ग्रामस्थ व संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांकडून माहिती जाणून घेतली.  

यावेळी आम्हा गोरगरीब जनतेवर दडपशाहीने अन्याय होत असल्याची खंत राज ठाकरे यांच्यासमोर प्रकल्पबाधित ग्रामस्थांनी मांडली. या प्रकल्पाची ‘मनसे’ च्या शिष्टमंडळामार्फत प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. हे शिष्टमंडळ आपल्याकडे अहवाल सादर करेल व त्यानंतरच आपण पक्षाची भूमिका जाहीर करू, असे राज ठाकरे यांनी प्रकल्पबाधित ग्रामस्थांना आश्‍वासन दिले. तसेच कोकणात येणार्‍या प्रत्येक प्रकल्पाला कोकणची जनता विरोध करून सर्वांगीण विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न करते, अशी भावना संपूर्ण राज्यासह देशात उमटू नये, अशी आपली प्रामाणिक इच्छा असून या प्रदूषणकारी प्रकल्पाला विरोध करताना कोकणच्या विकासासाठी दुसरा हितकारी प्रकल्प शासनासमोर ठेवणे आवश्यक असल्याचे मतही राज ठाकरे यांनी ग्रामस्थांसमोर व्यक्त केले.

 ‘मनसे’ नेते बाळा नांदगावकर यांना नाणार येथील रिफायनरी प्रकल्पबाधित 15 गावांतील सर्वसामान्य जनतेला प्रत्यक्ष भेटून व संपूर्ण अभ्यास करून अहवाल सादर करण्याचा आदेशही राज ठाकरे यांनी दिला आहे.  लवकरच बाळा नांदगावकर या परिसराचा दौरा करणार आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी लवकरच पक्ष निरीक्षक पाठवला जाईल व ते सुद्धा अहवाल सादर करतील, असे राज ठाकरे यांनी प्रकल्पबाधित ग्रामस्थांना आश्‍वस्त केले.

यावेळी ‘मनसे’चे नेते बाळा नांदगावकर, ‘मनसे’चे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, राजापूर तालुकाध्यक्ष राजेश पवार, संघर्ष समितीचे सत्यजित चव्हाण, चंद्रकांत गुरव, दिनेश चिले, रवि मिरजोळीकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, राज ठाकरे लवकरच राज्याचा दौरा सुरू करणार असून यावेळी ते सर्वप्रथम नाणार रिफायनरी प्रकल्प परिसराला भेट देणार असल्याची माहिती जितेंद्र चव्हाण यांनी दिली.