Mon, May 27, 2019 00:39होमपेज › Konkan › विर्डी प्रकल्पग्रस्तांचे उद्यापासून आमरण उपोषण

विर्डी प्रकल्पग्रस्तांचे उद्यापासून आमरण उपोषण

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 08 2018 10:36PM

बुकमार्क करा
दोडामार्ग : प्रतिनिधी

विर्डी प्रकल्पग्रस्तांना  वारंवार आश्‍वासने  देऊन प्रत्येक वेळेला  तोंडाला  पाने पुसण्यात आली आहे.  आता करो या मरो ची लढाई म्हणत  प्रकल्पग्रस्त बुधवार 10 जानेवारीला विर्डी   पुनर्वसन गावठण मध्ये  धरणग्रस्त समिती अध्यक्ष एकनाथ गवस यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाला बसणार आहेत. 

गेल्या 9 वर्षापासून  विर्डी प्रकल्पग्रस्त शासन दरबारी पुनर्वसनासाठी  न्याय मागण्यांसाठी लढा देत आहेत. पण यांच्या पदरी निराशाच पडत आहे.  आपल्या  नागरी सुविधांच्या मागण्यांसाठी  11 एप्रिल 2017 रोजी  सुरू केलेले उपोषण जिल्हाधिकारी  कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या  प्रशासकीय मंजूरीचे  लेखी पत्र मिळाल्यावर स्थगित केले होते.  त्यानंतर निविदा प्रक्रिया  पूर्ण करून  पुनर्वसन गावठणातील कामे चालू असणे ग्रामस्थांच्या मते अपेक्षित होते.

यासाठी  वारंवार पाठपुरावा  करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्यामुळे  नियोजित पुनर्वसन गावठणात 10 जानेवारीला प्रकल्पग्रस्त  आमरण उपोषण करणार आहेत. घर बांधणीसाठी भूखंडाचा त्वरीत  ताबा मिळणे, सन 2010 मध्ये  मिळालेल्या  घराच्या रक्कमेत  आता 2018 ला  घर बांधणे शक्य नसल्यामुळे विशेष अनुदान मिळावे, पुनर्वसन गावठणात  सर्व अठरा नागरी सुविधांचा लाभ, रस्त्यांचे काम, जमिनीचा मोबदला, पुनर्वसनसाठी जुन्या  घरांचे सामान पोच करण्याची व्यवस्था, प्रकल्पग्रस्तांना दाखले, ओळखपत्रे द्यावीत, धरण क्षेत्राबाहेरील  उत्पन्नाचा लाभ घेण्यासाठी रिंगरोड व्यवस्था, गावठणात रस्त्याच्या बाजूंना पिचींग करण्यात यावे, या मागण्यांच्या पूर्ततेसाठी  उपोषण करणार आहेत.