Wed, Jul 17, 2019 12:52होमपेज › Konkan › हिंसेला हिंसेने उत्तर देणे बाबासाहेबांचे विचार नाहीत : ना. आठवले

हिंसेला हिंसेने उत्तर देणे बाबासाहेबांचे विचार नाहीत : ना. आठवले

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 16 2018 10:09PMखेड : प्रतिनिधी

हिंसेला हिंसेने उत्तर देणे हे बाबासाहेबांना मान्य नव्हते व त्यांचे आम्ही अनुयायी असल्याने आम्हालादेखील ते मान्य नाही. परंतु, पुतळ्याची विटंबना होणार असेल तर ते योग्य नाही. पोलिसांना या प्रकरणी तपासात यश आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणी ‘सीआयडी’ चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. 

ना. आठवले यांनी शहरातील जिजामाता उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पाहणी केली व पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. त्यानंतर सोमवारी (दि. 16) सायंकाळी जिजामाता उद्यानात रिपब्लिकन पार्टीतर्फे आयोजित सभेला त्यांनी संबोधीत केले.

खेड शहरातील जिजामाता उद्यानातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकाने दि.26 मार्च रोजी विटंबना केली. त्यानंतर खेडसह संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. सोमवार दि.16 एप्रिल रोजी रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी खेडला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासोबत शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेसंदर्भातील तपासाबाबत माहिती घेतली. 

ते पुढे म्हणाले, मी आज या ठिकाणी सभेसाठी आलो नव्हतो. केवळ पुतळ्याची पाहणी करून या घटनेची माहिती घेण्यासाठी आलो होतो. परंतु, येथे आल्यानंतर मला कार्यकर्त्यांनी सभा आयोजित केल्याचे समजले. रिपब्लिकन पक्षाची भूमिका शांततेची व संयमाची आहे. मात्र, आमच्या संघटनेत अशाही कार्यकर्त्यांची फौज आहे की, जी वेळ आली तर वाटेल ती किंमत मोजण्यास तयार असेल. पोलिसांनी पुतळा विटंबनेनंतर श्‍वान पथकाला पाचारण केले होते परंतु, त्याला देखील संशयितांचा माग काढता आलेला नाही.

पोलिसांनी या सर्व गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे की, या ठिकाणी पुतळा विटंबनामागे कोणाचे राजकारण आहे. कोणी दलित-मराठा अथवा दलित सवर्णांमध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न करत आहे का, विनाकारण दलितांना भडकावून त्यांची ताकद खर्च करण्याचा कोणाचा प्रयत्न आहे का? याचा शोध घेणे गरजेचे आहे. या सगळ्या बाबींची चौकशी करताना पोलिसांनी 231च्या आसपास साक्षीदार तपासले असल्याचे सांगितले आहे. परंतु तरीदेखील त्यांना संशयित सापडत नसेल तर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या घटनेचा तपास ‘सीआयडी’कडे सोपवण्यास सांगणार आहे. कोणत्याही निर्दोष माणसाला पकडून अथवा कोणाचे नाव घेऊन राजकारण करावे, अशी भूमिका आमची नक्‍कीच नाही, असे ते म्हणाले. या सभेला ‘रिपाइं’चे कोकण कार्याध्यक्ष सिद्धार्थ कासारे, राज्य कार्यकारिणी सदस्य दादा मर्चंडे, जिल्हाध्यक्ष के.डी. कदम, आदींसह ‘रिपाइं’चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रीतम रूके यांनी केले.