Fri, Jul 19, 2019 00:54होमपेज › Konkan › खेळाडूंसाठी सुवर्णसंधी :  आ. राणे

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी :  आ. राणे

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 12 2018 10:56PM

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

सिंधुदुर्गात विनोद कांबळी क्रिकेट अ‍ॅकॅडमी स्थापन करण्यात आली असून कलमठ येथे सध्या रणजी क्रिकेटच्या धर्तीवर आवश्यक असणारे सुसज्ज मैदान उभारण्याचे काम सुरू आहे. ज्यांना क्रिकेटची आवड आहे व या खेळात नाव कमवायचे आहे अशा सिंधुदुर्गातील  19 व 16 वर्षाखालील मुलांना या अ‍ॅकॅडमीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आठ सिलेक्टर्स आणि स्वतः विनोद कांबळी हे यासाठी खेळाडूंचे सिलेक्शन करणार आहेत. ही निवड प्रक्रिया 15 ते 25 जानेवारीपर्यंत केली जाणार असून जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ही सुवर्णसंधी आहे अशी माहिती आ. नितेश राणे यांनी दिली.

कणकवलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. नितेश राणे म्हणाले, 15 ते 25 जानेवारी या दहा दिवसात जिल्ह्यातील आठही तालुक्यात मुख्य ठिकाणी एक संपर्क स्टॉल उभारला जाणार आहे. त्याठिकाणी ज्या खेळाडूंना या निवड प्रक्रियेत सहभागी होऊन क्रिकेटचे ट्रेनिंग घेण्याची इच्छा आहे त्यांनी या स्टॉलमध्ये जाऊन तिथे फॉर्म भरून द्यावयाचा आहे. या फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरून द्यावयाची आहे.

त्यानंतर पुढच्या प्रक्रियेसाठी संबंधीत खेळाडूंना फोनवर संपर्क साधून बोलावले जाणार आहे. यावेळी खेळाडूंनी व्हाईट शर्ट, व्हाईट पँट, स्पोर्ट शूज घालणे बंधनकारक आहे. या निवड प्रक्रियेसाठी विनोद कांबळींसह मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सिलेक्टर्स उपस्थित राहणार आहेत. पहिली 40 मुलांची बॅच असणार असून अशा बॅचेस निवडल्या जाणार आहेत. खेळाडूंनी निवड प्रक्रियेसाठी येताना आपल्या जन्मतारखेचा दाखला किंवा आवश्यक पुरावा घेऊन यावयाचा आहे. 16 वर्षांखालील मुलांसाठी त्यांचा जन्म 1 सप्टेंबर 2002 नंतर तर 19 वर्षाखालील मुलांसाठी त्यांचा जन्म 1 सप्टेंबर 1999 नंतर झालेला असावा.

त्यामुळे या निवड प्रक्रियेसाठी आठही तालुक्यातील तरूणांनी ज्यांना क्रिकेट खेळण्याची आवड आहे व प्रशिक्षण घ्यावयाचे आहे त्यांनी यामध्ये सहभागी व्हावे. ही निवड प्रक्रिया पुर्णपणे पारदर्शक पध्दतीने होणार आहे. दर महिन्याला काही दिवस स्वतः क्रिकेटपट्टू विनोद कांबळी व काही नामवंत खेळाडू हे या अ‍ॅकॅडमीत येऊन मुलांना प्रशिक्षण देणार आहेत, असे आ. नितेश राणे म्हणाले.