Mon, Jun 24, 2019 21:32होमपेज › Konkan › मंत्रिपदासाठीच राणेंकडून रिफायनरी विरोधाचा आभास 

मंत्रिपदासाठीच राणेंकडून रिफायनरी विरोधाचा आभास 

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 21 2018 10:21PMविजयदुर्ग : वार्ताहर

मंत्रिपदाच्या तडजोडीवरच जैतापूर अणूउर्जा प्रकल्पाप्रमाणेच ग्रीन रिफायनरी प्रकल्प सुरू करून दाखवेन,अशी हमी  नारायण राणे यांनी भाजपाच्या अध्यक्षांना दिली होती. आता मंत्रिपद लांबले असल्याने ते मिळविण्यासाठीच राणे प्रकल्पविरोधी असल्याचे भासवत आहेत, असा घणाघाती आरोप खासदार विनायक राऊत यांनी गिर्ये येथे शनिवारी झालेल्या प्रकल्पविरोधी जाहीर सभेत केला. गुजरातच्या हितासाठी असणारा व कोकणचे अस्तित्व संपविणारा  ग्रीन रिफायनरी प्रकल्प कधीही कोकणात होऊ देणार नाही,असेही त्यांनी सांगून प्रकल्पाबाबत शिवसेनेची जनतेसोबत राहण्याची भूमिका स्पष्ट केली.

गिर्ये येथे ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात जाहीर सभा शिवसेनेच्यावतीने शनिवारी सायंकाळी उशिरा झाली. यावेळी खा.विनायक राऊत बोलत होते. आ. वैभव नाईक, जिल्हा संर्पकप्रमुख अरूण दुधवडकर, कणकवली विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद गावडे, गिर्ये सरपंच  रूपेश गिरकर, जि.प.सदस्य प्रदीप नारकर, जि.प. सदस्य हरी खोबरेकर, जि.प.सदस्या सौ.वर्षा पवार, उपसभापती संजय देवरूखकर, शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद साटम, अ‍ॅड. प्रसाद करंदीकर, कणकवली शिवसेना तालुकाप्रमुख सचिन सावंत, रामेश्‍वर संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश केळकर, संदिप डोळकर, दादा पडेलकर आदी उपस्थित होते.

खा.विनायक राऊत पुढे म्हणाले,हा प्रकल्प कोकणचे अस्तित्व संपविणारा आहे तर गुजरातसाठी फायदेशीर ठरणार आहे.शिवसेना हा प्रकल्प येथे कदापीही होवू देणार नाही. ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा गुजरात मधील उद्योगपतींना व अदानींना  मोठा करणारा असून गिर्येमध्ये शहा आडनावे असलेल्या गुजरातमधील सात व्यापारांनी जमीन घेतली आहे.यामुळे या प्रकल्पाचा फायदा हा गुजरातमधील कंपनींना व अदानींना होणार आहे.यावेळी त्यांनी मंगलोरमध्ये असणार्‍या रिफायनरी प्रकल्पामुळे तेथे झालेली अवस्था यावेळी मांडली.अनेक एजंटांनी यापूर्वीच येथील भूमिपुत्रांना फसवून जमिनी खरेदी केल्या असून मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पबाधित क्षेत्रात गेल्यावर्षी झालेले सर्व जमीनव्यवहार रद्द करावेत, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी मातोश्रीवर धमकविण्याचे काम चालते हा  नारायण राणे यांचा आरोप हास्यास्पद असून मातोश्रीवर कार्यकर्ता घडविला जातो.नारायण राणे यांनाही मातोश्रीनेच घडविले अन्यथा आज अडगळीत पडले असते असा टोला लगावला.आ.वैभव नाईक, विलास साळसकर,शैलेश भोगले, दादा पडेलकर, हरी खोबरेकर  यांनीही प्रकल्पाच्या विरोधात आपले विचार मांडले.सूत्रसंचालन प्रसाद दुखंडे व आभार संदीप डोळकर यांनी केले.