Mon, Apr 22, 2019 05:40होमपेज › Konkan › राज्यातील गुणवंत अधिकारी पुरस्कार विजय चव्हाण यांना

राज्यातील गुणवंत अधिकारी पुरस्कार विजय चव्हाण यांना

Published On: May 09 2018 2:04AM | Last Updated: May 08 2018 10:34PMकुडाळ : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाचा विकास सेवेतील ‘गुणवंत अधिकारी 2018’ हा शासनाचा प्रतिष्ठेचा आणि मानाचा समजला जाणारा पुरस्कार सिंधुदुर्ग सुपुत्र कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांना नुकताच जाहीर झाला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या इतिहासात राज्यस्तरावरी गुणवंत अधिकारी पुरस्कार प्रथमच विजय चव्हाण यांच्यारूपाने तळकोकणाला मिळाला आहे. विजय चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पांग्रड गावचे सुपुत्र असून त्यांचा हा गौरव झाल्यामुळे जिल्हा परिषद वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे.

या पुरस्काराकरिता महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र विकास सेवेतील  अधिकार्‍यांनी मागील सलग 10 वर्षे केलेल्या सेवेतील विशेष कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. शासनाच्या विविध योजना, तळागाळातील  जनतेसाठी  राबविताना दाखविलेली आपुलकी, जनता, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांच्याशी असलेला संपर्क, ग्रामीण जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी दाखवलेली तत्परता, राबविलेले नाविण्यपूर्ण उपक्रम, सहकारी अधिकारी, ग्रामीण जनता,  कर्मचारी यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, मागील 10 वर्षाचे अ प्लस गोपनिय अहवाल यांचेही मुल्यमापन करण्यात आले.

यशवंत पंचायत राज अभियान 7 वर्षे कोकण विभागामध्ये प्रथम व राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय क्रमांकाचा सन्मान, पर्यावरण विकास रत्न पंचायत समिती पुरस्कार, आयएसओ पंचायत समिती, कुपोषण मुक्‍त पंचायत समिती, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत कोकण विभागात  दरवर्षी सर्वाधिक  केलेले गौरवास्पद कामे, फळझाड लागवड, एकाच दिवशी 400 हून जास्त कच्चे बंधारे, पंचायत समिती सभागृह चालवताना सचिव म्हणून पार पाडलेली कुशल भूमिका, पंचायत राज समितीने मालवण व देवगड येथील कामांचे केलेले कौतुक व अभिनंदन याशिवाय  एक कलाकार, रंगकर्मी, समाजसेवक, आदी बाबींचाही या मुल्यमानात सहभाग आहे. श्री. चव्हाण यांना प्रतिष्ठेचा व मानाचा पुरस्कार शासनाने जाहीर केल्याचे कळताच आ. वैभव नाईक, जि.प. उपाध्यक्ष रणजित देसाई, कुडाळ सभापती राजन जाधव, ग्रामसेवक संघटना, अधिकारी-कर्मचार्‍यांकडून त्यांचे खास अभिनंदन करण्यात आले.