Fri, Jul 19, 2019 22:01होमपेज › Konkan › विजापूर महामार्गाचे काम रहिवाशांनी रोखले

विजापूर महामार्गाचे काम रहिवाशांनी रोखले

Published On: Jul 22 2018 10:35PM | Last Updated: Jul 22 2018 8:33PMचिपळूण : खास प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्गाच्या दुटप्पी धोरणामुळे गुहागर विजापूर मार्गाचे काम वर्षभर रखडले आहे. भूसंपादन न करताच दिलेली वर्क ऑर्डर हा महत्वाचा मुद्दा असून मार्गालगतच्या लोकांनी काम रोखले आहे. मात्र, प्रशासनाने मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण करताना घेतलेली दक्षता विजापूर मार्गाच्या कामात न घेतल्याने हे काम रखडले आहे. आता या रस्त्यासाठी ऑगस्टनंतरच संयुक्त मोजणी होणार आहे.

गुहागर -विजापूर मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले आहे. यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाचे रुंदीकरण करून तीन पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय घेताना प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने धोरण राबवून रस्त्यासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन न करताच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आणि ठेकेदाराला कामाचे आदेश देण्यात आले. मात्र, गेले वर्षभर या रस्त्याचे काम रखडले आहे. ठेकेदाराने काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुहागर तालुक्यात या ठेकेदाराला अडविण्यात आले. या नंतर संबंधीत ठेकेदाराने गुहागरमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला नाही. शासनाने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून जागा ठेकेदाराच्या ताब्यात देणे आवश्यक असताना या ठिकाणी चुकीचे धोरण राबविले आहे. 

या उलट मुंबई -गोवा महामार्गाचे काम करताना आधी भूसंपादन त्या नंतर ठेकेदाराला ‘वर्क ऑर्डर’ असे धोरण राबविण्यात आले आहे. खरेतर दोन्ही रस्ते राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अंतर्गत येत असताना या ठिकाणी वेगवेगळे धोरण राबविल्याने गुहागर विजापूर मार्गाचे काम अडचणीत सापडले आहे. 

गुहागर-विजापूर रस्त्याच्या भूसंपादना साठी 40 कोटींचा निधी प्रांत कार्यालयात आला असताना वर्षभर या भूसंपादनाचे कार्यवाही करण्यातच आलेली नाही. आता प्रशासनाला जाग आली असून महामार्ग बांधकाम विभागाने भूसंपादनासाठी आवश्यक निधी उपलब्ध केला आहे. त्यामुळे ऑगस्टनंतर या रस्त्यासाठी संयुक्त मोजणी होणार आहे. गुहागर रस्त्याचे तीन पदरी रस्त्यात रुंदीकरण होणार आहे. या कामाला मार्गावरील ग्रामस्थांचा विरोध नाही फक्त जमिनीचां मोबदला योग्य मिळावा, अशी मागणी आहे.त्यासाठी संघर्ष समिती स्थापन झाली असून माजी सभापती जितेंद्र चव्हाण यासाठी लढा देत आहेत. 

मुळात ठेकेदाराला वर्क ऑर्डर देवून वर्ष उलटले तरी या रस्त्याच्या कामासाठी वाढीव आवश्यक असणार्‍या जागेचे भूसंपादन करण्यासाठी महसूल प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केलेली नाही. सुरुवातीला हा रस्ता कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे देण्यात आला होता. मात्र, अडचणी वाढल्यानंतर हा निर्णय बदलून या रस्त्याची जबाबदारी रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे देण्यात आली. यामध्ये प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे हे काम अडचणीत सापडले आहे. 

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे काम असताना या रस्त्यासाठी वेगळे धोरण का असा सवाल उपस्थित होत आहे.आधी भूसंपादन त्यानंतर वर्क ऑर्डर असा निकष मुंबई गोवा -महामार्गाचे काम करताना लावण्यात आला आहे. मात्र गुहागर-विजापूर रस्त्याच्या कामात आधी वर्क ऑर्डर निघाली आहे. आता मागाहून प्रशासनामार्फत संयुक्त मोजणीची कार्यवाही करण्यात येत आहे. या मार्गावर कुठली वळणे काढणार आणि त्यासाठी कोणाची जमीन संपादित होणार कोणाला किती नुकसान भरपाई मिळाणार ही उत्तरे संयुक्त मोजणी नंतरच मिळणार आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मोजणी होणे महत्वाचे असून प्रशासनानेच या रस्त्याचे दोन्ही बाजूला दगड टाकून हद्द ठरवायची आहे. मात्र, अशी अंमलबजावणी न झाल्याने या मार्गाचे काम रखडले आहे. ग्रामस्थाना या रस्त्याबाबत योग्य मार्गदर्शन न झाल्याने संघर्ष समिती स्थापन झाली आहे. या रस्त्याच्या अनेक पटीने मोठे असणारे मुंबई गोवा महामार्गाचे काम मार्गी लागते पण येथे चुकीचे धोरण आखल्याने हा रस्ता अडचणीत सापडला आहे. ठेकेदाराने चिपळूण तालुक्यातील काही भागात काम सुरु केले.

कोयना प्रकल्पाच्या शासकीय जागेत 2 कि.मी. चे काम ठेकेदाराने सुरु केले आहे. अनेक ठिकाणी सिमेंटच्या मोर्या  टाकण्यात आल्या आहेत.मात्र लोकांचा विरोध लक्षात घेऊन त्याने हि काम थांबविले आहे. प्रशासनाने भूसंपादन करून द्यावे रस्त्याची लाईन  आवूट द्यावी, अशी भूमिका ठेकेदाराने घेतली आहे. या गोंधळातच गुहागर-विजापूर रस्त्याचे काम रखडलेले आहे.