Sun, Apr 21, 2019 13:45होमपेज › Konkan › विदर्भातील शिक्षकांचे कोकणात पुनर्वसन नको!

विदर्भातील शिक्षकांचे कोकणात पुनर्वसन नको!

Published On: May 15 2018 1:35AM | Last Updated: May 14 2018 11:11PMओरोस ः प्रतिनिधी

विदर्भ, मराठवाड्यातील शिक्षकांचे कोकणात पुनर्वसन नको, जिल्हा बदल्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी व येथील बेरोजगारी कमी करण्यासाठी धोरणात बदल करून आगामी भरतीत स्थानिक डी. एड., बी. एड. बेरोजगारांना 70 टक्के आरक्षण मिळावे या मागणीसाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा डी. एड., बी. एड.धारक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.

सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा डी.एड., बी. एड.धारक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून आपले उपोषण सुरू केले. स्थानिकांना भरतीत प्राधान्य द्या या मागणीसाठी केलेल्या  या उपोषणाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष भीवसेन मसुरकर, उपाध्यक्ष भाग्यश्री रेवडेकर, लखू खरात यांनी केले. यावेळी भाग्यश्री नर, वृषाली शिंदे, गणपत डांगींसह डी. एड., बी. एड. बेरोजगार मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी झाले होते.  या उपोषणास राज्य शिक्षक समितीचे राजन कोरगावकर, अध्यक्ष नंदकुमार राणे, चंद्रसेन पाताडे, नामदेव जांभवडेकर, चंद्रकांत अणावकर आदी उपस्थित होते.

शिक्षक भरतीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  डी.एड., बी. एड.पदवीधारकांना प्राधान्य द्यावे या मागणीसाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे लक्षवेधी उपोषण सुरू केले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे कोकणातील जिल्हे दुर्गम भागात आहेत. अशा प्रतिकुल परिस्थिीत डी.एड., बी. एड. स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य मिळावे या आशेने शासनाकडे पाहत आहेत.

शिक्षक भरती सुरू होण्याच्या मार्गावर असताना गुण वाढवून देणार्‍या रॅकेटने राज्यभर खळबळ उडाली आहे. 2010 प्रमाणे आताच्या भरतीतही गैरप्रकार घडत असून गुण वाढवून देण्याबाबतचे संभाषणही व्हायरल झाले आहे. या रॅकेटची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच आगामी भरतीत स्थानिकांना 70 टक्के प्राधान्य द्यावे अन्यथा परप्रांतीय उमेदवारांची भरती झाल्यास या विरोधात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या कांकणातील जिल्ह्यात बोगस शिक्षकांना रूजू करून न घेण्याबाबत प्रत्येक जिल्ह्यात उपोषण करणार असल्याचा इशारा संघटनेने दिला. 

2010 च्या भरतीचा सर्वाधिक फटका कोकणाला

2010 साली रत्नागिरी जिल्ह्यात 1157 जागांसाठी शिक्षक भरती झाली. त्या भरतीत जिल्ह्यातील स्थानिक तरणांना डावलण्यात आले होते. जिल्ह्यातील फक्‍त 37 उमेदवार नोकरीला आहेत. उर्वरित उमेदवार विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रातील होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हिच स्थिती होती. जिल्हास्तरावर होणारी भरती 2010 नंतर राज्यस्तरावरून झाल्याने याचा सर्वात मोठा फटका कोकणातील तरूणांना बसला आहे. हेच धोरण पुन्हा राबविले जात आहे. ते रद्द करावे तसेच विदर्भ , मराठवाड्यातील  बेरोजगारांचे कोकणात पुनर्वसन नको आदी मागण्या डी.एड., बी.एड. धारक संघटनेच्या  आहेत.