Fri, Jul 19, 2019 05:01होमपेज › Konkan › रत्नागिरी पंचायत समिती सभापतीपदी विभांजली पाटील बिनविरोध

रत्नागिरी पंचायत समिती सभापतीपदी विभांजली पाटील बिनविरोध

Published On: Jun 30 2018 1:17AM | Last Updated: Jun 29 2018 10:10PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेच्या विभांजली विठोबा पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सव्वा वर्षांनंतर मेघना पाष्टे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्‍त झालेल्या पदासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभापतीपदासाठी विभांजली पाटील यांचा एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. 20 पैकी 18 सदस्य शिवसेनेचे असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

पंचायत समितीच्या नूतन सभापती विभांजली पाटील यांनी तब्बल 10 वर्षे मिरजोळे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांचे पती विठोबा पाटीलसुद्धा यापूर्वी पंचायत समिती सदस्य होते. त्यांनीही सरपंचपद भूषवले आहे. असा राजकीय वारसा असलेल्या किंवा पूर्ण अनुभव असलेल्या कुटुंबातील सौ. पाटील यांना पं. स. सभापतीपद मिळाले आहे.

रत्नागिरी पंचायत समितीवर शिवसेनेचे पूर्ण वर्चस्व आहे. 20 पैकी 18 सदस्य शिवसेनेचे आहेत. पहिली सव्वा वर्षे मेघना पाष्टे यांना संधी देण्यात आली. सव्वा वर्षांची मुदत संपल्यानंतर तालुकाध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी यांनी त्यांना पदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. या रिक्‍त झालेल्या सभापती निवडीसाठी शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रांत अमित शेडगे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. विभांजली पाटील यांचा एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे दुपारी 2.30 वाजता निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवड झाल्यानंतर शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांसह पं. स. सदस्य व शिवसैनिकांनी त्यांचे अभिनंदन केले.