Fri, Apr 26, 2019 20:04होमपेज › Konkan › वेर्लेतील शौचालय भ्रष्टाचार प्रकरणाच्या फेरचौकशीचे आदेश

वेर्लेतील शौचालय भ्रष्टाचार प्रकरणाच्या फेरचौकशीचे आदेश

Published On: Jun 19 2018 1:31AM | Last Updated: Jun 18 2018 10:45PMसावंतवाडी : हरिश्‍चंद्र पवार

वेर्ले गावातील शौचालय वाटप भ्रष्टाचारप्रकरणी नव्याने तपास  पंधरा दिवसांत करून त्याचा अहवाल  कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठविण्याचे आदेश कोकण विभाग महसूल उपायुक्त गणेश चौधरी यांनी जि. प. प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात सहभागी शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. 

वेर्लेमध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत 103 लाभार्थ्यांना शौचालय वाटप करताना आर्थिक गैरव्यवहार केल्याचे 2016 मध्ये विशेष लेखापरीक्षणात उघड झाले होते.या प्रकरणात सुमारे 35 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे प्रथम दर्शनी निश्‍चित झाले. याप्रकरणी तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक  यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करुन प्रशासनाने त्यांना सेवेतून निलंबित केले. या प्रकरणातील कंत्राटदारावरही फौजदारी गुन्हा दाखल करून त्यालाही अटक करण्यात आली होती. शिवसेनेचे तत्कालीन पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत यांनी या प्रकरणाला वाचा फोडली होती. तसेच  पं.स. मधील शिवसेनेचे तत्कालीन  गटनेते अशोक दळवी यांनी सभागृहात हे प्रकरण लावून धरले होते.

या प्रकरणी जुजबी कारवाईनंतर आर्थिक व्यवहाराशी संबंधित असलेले किंबहुना ज्यांच्या सहीने स्वच्छ भारत अभियानचा निधी देण्यात आला ते तत्कालीन गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, लेखाधिकारी, कक्षाधिकारी, गटसमन्वयक यांच्याविरुद्ध ठोस कारवाई झाली नाही. या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशासनाने केवळ कारणे दाखवा नोटीस पाठविली.

या प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र नागरी क्षेत्र (शिस्त व अपील) 1979 चे कलम 6 अन्वये व जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिक्षा व अपील 1964 चे कलम 6 या नुसार कारवाईची टिप्पणी ठेवण्यात आली होती. परंंतु, ठोस कार्यवाही झाली नाही, असा आक्षेप कोकण विभाग उपायुक्तांनी घेतला आहे.  या प्रकरणाचा फेर तपास  पंधरा दिवसांत करुन त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश सिंधुदुर्ग जि. प. प्रशासनाला दिले आहेत.

वेर्ले शौचालय भ्रष्टाचार प्रकरणाचा पुनःश्‍च अहवाल सादर करण्याच्या कोकण उपायुक्तांच्या आदेशामुळे नेमकी वस्तुस्थिती समोर येणार असून यामध्ये बडे अधिकारी गळाला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.