Sat, Apr 20, 2019 18:01होमपेज › Konkan › वेंगुर्ले येथे 16 फेब्रुवारीपासून साहित्य संमेलन

वेंगुर्ले येथे 16 फेब्रुवारीपासून साहित्य संमेलन

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 05 2018 11:37PMवेंगुर्ले  :शहर वार्ताहर 

वेंगुर्ले तालुकास्तरीय दुसरे त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलन येत्या 16 व  17 फेब्रुवारी रोजी होणार असून सातेरी प्रासादिक संघ संचालित आनंदयात्री वाङ्मय मंडळाने या साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. वेंगुर्ले येथील सिद्धीविनायक मंगल कार्यालय भटवाडी,  मंगेश पाडगावकर साहित्यनगरीत हे साहित्य संमेलन होणार  आहे.  बॅ. खर्डेकर महाविद्यायात आयोजित पत्रकार परिषदेत साहित्य संमेलनाची माहिती दिली.

अध्यक्षा साहित्यिका सौ. वृंदा कांबळी,प्रा. आनंद बांदेकर, प्रा. सचिन परुळकर, सौ. माधवी मातोंडकर, जयराम वायंगणकर, डॉ. संजीव लिंगवत, सचिन वराडकर, रफिक शेख, महेश राऊळ, चैतन्य दळवी, सुषमा खानोलकर, वृंदा गवंडळकर, गुरुदास तिरोडकर, सुनील जाधव आदी उपस्थित होते.या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोल्हापूरच्या महावीर कॉलेजचे प्राचार्य आणि लेखक प्रा.सुनीलकुमार लवटे हे असून उद्योजक आणि जिंदाल उद्योग समूहाचे महाव्यवस्थापक पुष्कराज कोल्हे  हे या संमेलनाचे उद्घाटक तर उद्योजक दिगंबर नाईक हे स्वागताध्यक्ष म्हणून लाभले आहेत.

या संमेलनात वैविध्यपूर्ण अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची  माहिती ज्येष्ठ साहित्यिक आणि आयोजक वृंदा कांबळी यांनी दिली.  16 फेब्रुवारीला पाटकर हायस्कूल मैदान ते संमेलन स्थळ ( सिद्धिविनायक मंगल कार्यालय, भटवाडी ) पर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून यामध्ये पाटकर हायस्कूलचे लेझीमपथक, वेंगुर्ला हायस्कूलचे झांज पथक, प्रशिक्षक पुंडलिक हळदणकरचे कराटे पथक, वारकर्‍यांचे भजन इत्यादी संघ आणि संतांच्या चरित्रातील प्रसंगांवर आधारित चित्ररथ असेल. 6.30 ते 8 या वेळेत वेंगुर्ले तालुक्यातील कवींचे एक खुले कवी संमेलन ‘गाज’ या नावाने असणार आहे.

17 फेब्रुवारी रोजी 9.30 ते 11.30 या कालावधीत उद्घाटन सोहळा आणि सत्कार समारंभ. 11.30 ते 1.30 कथेचे नाट्यीकरण, कथाकथन आणि काव्यवाचन अशा कार्यक्रमांनी भरलेला ‘साहित्य दरवळ’ हा कार्यक्रम शरयू आसोलकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दुपारी 2.30 ते 3 या वेळेत मराठी भाषेचा गौरव करणार्‍या निवडक कवितांच्या गायनाचा कार्यक्रम,3 ते 4.30 वा.निवडक निमंत्रित कवींचे कवी संमेलन साहित्यिक उषा परब यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्यानंतर पारितोषिक वितरण आणि समारोप होणार आहे.