Sat, Feb 23, 2019 16:19होमपेज › Konkan › सहकार्य करणार्‍या मच्छीमारांचा अधीक्षकांकडून गौरव

सहकार्य करणार्‍या मच्छीमारांचा अधीक्षकांकडून गौरव

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 12 2017 11:30PM

बुकमार्क करा

वेंगुर्ले ः प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी मंगळवारी वेंगुर्ले पोलीस ठाण्याला भेट देत वार्षिक तपासणी केली. त्यांच्या हस्ते वेंगुर्ले समुद्र किनारपट्टीवर ओखी चक्रीवादळामुळे समुद्रात फसलेल्या गस्ती नौका सुरक्षित ठिकाणी आणण्यास मदत केलेल्या मच्छिमारांचा सत्कार करण्यात आला. पोलिस अधीक्षकांकडून जिल्ह्यातील पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी केली जात आहे. वेंगुर्ले पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी त्यांचे स्वागत केले. उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस,  सहायक पोलिस निरीक्षक संतोष कोळी, पोलिस उपनिरीक्षक नाईक,  प्रकाश सारंग आदी उपस्थित होते. 

श्री. गेडाम यांनी वेंगुर्ले पोलिस ठाण्यातील प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेतला. त्यानंतर तालुक्यातील स्थानिक मच्छिमार, सागररक्षक  सदस्य, पोलिस पाटील यांची बैठक घेतली. या बैठकीत कोकण किनारपट्टीवर आलेल्या ओखी वादळात मच्छिमार बांधव, सागर रक्षक दल, पोलिस पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावत समुद्र किनारी भागामध्ये सतर्क राहून वादळात होणारी नुकसानीची तीव्रता कमी केली, यासाठी श्री.  गेडाम यांनी त्यांचे आभार मानले व भविष्यात आपतकालीन स्थितीत अशाच प्रकारे मदत करण्याचे आवाहन केले. वेंगुर्ले बंदर समुद्रात पोलीस विभागाची गस्ती नौका वादळात सापडली होती. ही गस्ती नौका सुरक्षित बाहेर काढण्यासाठी दाघभोसवाडा येथील मच्छिमार झुजय फर्नांडिस, मोहन सागवेकर, गुंडू खोबरेकर, कामिल फर्नांडिस तसेच  सागरकन्या नौके वरील पोलिस उपनिरीक्षक प्रकाश सारंग यांनी यशस्वी प्रयत्न केले. याबद्दल    दीक्षितकुमार गेडाम यांच्या हस्ते त्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. ओखी वादळात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलिसांचाही गौरव करण्यात आला.