Wed, Apr 24, 2019 08:15होमपेज › Konkan › ग्रंथदिंडीने दुमदुमली वेंगुर्लेनगरी

ग्रंथदिंडीने दुमदुमली वेंगुर्लेनगरी

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 16 2018 11:00PMवेंगुर्ले : शहर वार्ताहर

सातेरी प्रासादिक संघ वेंगुर्ले संचलित आनंदयात्री वाङ्मय मंडळ आयोजित  वेंगुर्ले तालुका त्रैवार्षिक (दुसर्‍या) साहित्य संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी काढण्यात असलेल्या ग्रंथदिंडीने वेंगुर्ले नगरी दुमदुमली. 

वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामीण भागातील लिहित्या हातांना व्यासपीठ व योग्य दिशा मिळावी तसेच तालुक्यातील साहित्यिक, रसिक,वाचक,साहित्यप्रेमी,अभ्यासक यांच्यामध्ये स्नेह वृद्धिंगत व्हावा यासाठी येथील मंगेश पाडगावकर साहित्यनगरीत सिद्धिविनायक मंगल कार्यालय वेंगुर्ले येथे सातेरी प्रासादिक संघ वेंगुर्ले संचलित आनंदयात्री वाङ्मय मंडळाने किरात ट्रस्ट,बॅ. खर्डेकर महाविद्यालय, वेताळ प्रतिष्ठान तुळस व कलावलय वेंगुर्ले यांच्या सहकार्याने  16 व 17 फेब्रुवारी रोजी मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. शुक्रवारी संध्याकाळी 4 वा. येथील रा. कृ. पाटकर हायस्कूल कडून या ग्रंथदिंडीस सुरुवात करण्यात आली व 6 वा. मंगेश पाडगावकर नगरी येथे दिंडी विसर्जित करण्यात आली.  

या ग्रंथदिंडीत हभप सावळाराम कुरले यांचे वारकरी भजन, वेंगुर्ले शाळा नं. 2 चे लेझीम पथक, वेंगुर्ले हायस्कूलचे झांज पथक, रा. कृ. पाटकर हायस्कूलचे एरोबिक पथक, बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा. संजय पाटील, शंकर कोणेकर व महेश  घाडी यांचा महाराष्ट्रीयन संतांचा चित्ररथ, सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचे लेझीम पथक, खर्डेकर महाविद्यालयाचा महिला विकास कक्ष आदी सहभागी झाले होते. या ग्रंथदिंडीतील मृदंग, झांज, लेझीम, ढोल ताश्याच्या आवाजात वेंगुर्लेनगरी दुमदुमली.

या ग्रंथदिंडीत मराठी साहित्य संमेलन संयोजक समिती अध्यक्षा सौ. वृंदा कांबळी, प्रा. आनंद बांदेकर,प्राचार्य विलास देऊलकर,आत्माराम सोकटे, प्रा. सचिन परुळकर, गुरुदास तिरोडकर, महेश राऊळ, सीमा मराठे, सुरेश कौलगेकर, अवधूत नाईक, रवींद्र परब,  पूजा कर्पे, गीता गावडे, आनंद परब, गजानन परब, जयराम वायंगणकर आदी साहित्यप्रेमी सहभागी झाले होते.रात्रौ कवी आनंद वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली ‘गाज’ हे खुले कवी संमेलन झाले. या संमेलनाचे निवेदन डॉ.संजीव लिंगवत यांनी केले. शनिवारी सकाळी 9.30 वा. े प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक पुष्पराज कोले यांच्या हस्ते या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.