Sun, Aug 18, 2019 20:36होमपेज › Konkan › आंतरराष्ट्रीय बाजारात काजूचा दर घसरला!

आंतरराष्ट्रीय बाजारात काजूचा दर घसरला!

Published On: Aug 03 2018 10:40PM | Last Updated: Aug 03 2018 10:20PMवेंगुर्ले : शहर वार्ताहर

निर्यात काजूदर कमी झाल्याने व काजू निर्यात घसरल्याने देशात काजूगर विक्रीचे दर घसरले आहेत. महाराष्ट्रातील विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू दर्जेदार असल्याने आणि त्याला मागणी यापूर्वी चांगली असल्याने चांगला दर देऊन कारखानदारांनी काजू खरेदी केला खरा, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारातच काजूचे दर घसरल्याने मोठ्या दराने काजू खरेदी केलेले कारखानदार आर्थिक अडचणीत आले आहेत. 

या अडचणीतून काजू उद्योग सावरण्यासाठी महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनतर्फे मागणी केलेले सर्वंकष काजू उद्योगाचे धोरण ताबडतोब अंमलात आणल्यास महाराष्ट्रातील काजू उद्योग सावरण्यासाठी मदत होईल, असे मत महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी व्यक्त केले.

2018 च्या सुरुवातीला काजूगर दराच्या निर्यातीत घट झाली. व्हिएतनामकडून होणारा निर्यात काजूगर अमेरिका व इतर देशांनी त्याची गुणवत्ता चांगली नसल्याने त्याची निर्यात कमी केली.त्याचा परिणाम काजू बीच्या जागतिक मार्केटवर झाला. काजू बी खरेदी थांबल्याने काजूवरील मोठमोठे प्रक्रिया उद्योग मागे सरले. मात्र, महाराष्ट्रातील काजू पीकच कमी असल्याने व काजूचा दर्जा चांगला असल्याने नेहमीप्रमाणे काजू बीच्या खरेदीसाठी स्पर्धा वाढली. अर्थातच या स्पर्धेमुळे  कारखानदारांनी महाराष्ट्रातील काजू बीला दर चांगला दिला. परिणामी मुळातच काजू बी खरेदीचा दर महाग असल्याने  तसेच वाळविण्याची अपुरी सोय यामुळे उत्पादन खर्च वाढत गेला व  इतर राज्यातून म्हणजेच मेंगलोर, आंध्रप्रदेश, ओरिसा, तामिळनाडू येथून कमी दराने येणारा काजूगर यामध्ये मोठी तफावत असल्याने कमी दराचा काजूगर विक्री होऊ लागला आहे. त्याचबरोबर निर्यात काजूगराचा दर मोठया प्रमाणात उतरल्याने तो काजूगर महाराष्ट्रात तसेच देशाच्या अन्य राज्यात विक्रीसाठी कमी दराने  उपलब्ध होऊ लागला आहे. त्यामुळे अर्थातच महाराष्ट्रात जास्त दराने काजू बी विकत  घेतलेले काजू उद्योजकांना त्यांच्या उत्पादन खर्चाच्या कमी दराने विक्री करावी लागल्याने ते मोठ्या आर्थिक संकटात येतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शासनाने काजूबद्दल सर्वंकष विकासाचे  धोरण अमलात आणून काजू उद्योजकाना नवसंजीवनी प्राप्त करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी केली.