होमपेज › Konkan › चिपळुणात भाजी विक्री बंद

चिपळुणात भाजी विक्री बंद

Published On: Feb 06 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 10:39PMचिपळूण : शहर वार्ताहर

अतिक्रमण हटाव मोहीम अंतर्गत शहरातील भाजी व्यापार्‍यांवर चिपळूण न. प. कडून होणार्‍या कारवाईच्या निषेधार्थ शहरातील एकवटलेल्या भाजी व्यापार्‍यांनी सोमवारी (दि. 5) मंडईच्या प्रवेशद्वारावर निषेध फलक लावून दिवसभर ठाण मांडले. मात्र, न. प. कडून आजच्या कारवाईला पोलिस बंदोबस्ताअभावी तात्पुरती स्थगिती देण्यात आली. चिपळूण न. प. व भाजी व्यापारी यांच्यातील मंडईसंदर्भातील वाद गेली अनेक वर्षे सुरू आहे. हा वाद हळूहळू चिघळू लागला आहे.

दोन्हीकडून हा विषय प्रतिष्ठेचा करण्यात आला आहे. दरम्यान, चिपळूण न.प.ने शहरातील सर्वच अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार या मोहिमेला सोमवारी सुरुवात होणार होती. त्यापूर्वी न. प. प्रशासनाकडून सर्वांना सूचना देण्यात आली. प्रामुख्याने मंडईसमोरील मोकळ्या जागेतील भाजी व्यापार्‍यांना याबाबत  सूचना देण्यात आली.

चना मिळाल्यामुळे सर्व भाजी व्यापार्‍यांनी संघटनेच्या माध्यमातून एकत्रित बैठक घेतली. या मोहिमेला तीव्र विरोध करायचा निर्णय घेतला. तसेच निषेध म्हणून सोमवार व मंगळवारी सर्व विक्रेत्यांनी आपापले व्यवसाय बंद ठेवण्याचे जाहीर केले. त्यानुसार चिपळूण शहर परिसर, खेर्डी व आजूबाजूच्या परिसरातील भाजी व्यावसायिकांनी भाजी विक्री व्यवसाय उत्स्फूर्तपणे बंद ठेवून न.प. कारवाईचा निषेध केला. 

मोहिमेला सोमवारी सकाळी सुरुवात होईल, असा अंदाज व्यापारी संघटनेने घेऊन सकाळपासूनच मंडई समोरच्या मोकळ्या प्रवेशद्वारावर ठाण मांडले. सुमारे दोनशे ते अडीचशे भाजी विक्रेत्यांनी निषेधाचा फलक लावत परिसरात बैठक मारली. चिपळूण न.प. कडून दुपारी उशिरापर्यंत मंडई परिसरासह शहरात अतिक्रमण हटाव मोहीम कुठेही राबविण्यात आली नाही. 

आवश्यक असणारा पोलिस बंदोबस्त वेळीच उपलब्ध न झाल्याने मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आली. या मोहिमेला पोलिस बंदोबस्तात गुरुवार दि. 8 रोजी सुरुवात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. एकूणच गेली दहा वर्षे  सुरू असलेला मंडई संदर्भातील चिपळूण न.प. व भाजी व्यापारी यांचा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. निषेध व दोन दिवस भाजी विक्री बंदच्या माध्यमातून हा वाद चिघळला आहे.