Mon, Jun 17, 2019 03:14होमपेज › Konkan › खेळामुळे दहावीच्या परीक्षेत ‘नंबर वन’ !

खेळामुळे दहावीच्या परीक्षेत ‘नंबर वन’ !

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 25 2018 8:18PMदेवरुख : नीलेश जाधव

खेळ हा फिटनेससाठी जसा महत्त्वाचा आहे. तसाच शालेय जीवनामध्येही त्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. विद्यार्थ्याने मिळविलेल्या टक्केवारीची सरासरी वाढण्यास खेळ महत्त्वाचा ठरत असल्यामुळे खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. जिल्हा व राज्य पातळीवर खेळात चमकणारी मुले अभ्यासातही पहिली येतातच असे नाही. परंतु, येथील अरुंधती पाध्ये इंग्रजी स्कूलचा विद्यार्थीं वेदांत रवींद्र गिडये याने तायक्वांदोमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत खेळात मिळविलेल्या 4 टक्के गुणांमुळे शालांत परीक्षेत एकूण 96.80 टक्के गुण मिळवत शाळेत पहिला येण्याची किमया साधली आहे.

लहानपनापासूनच हुशार असलेल्या वेदांतने वडील व शाळेतील शिक्षक आणि तायक्वांदो प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी व मयूर घेवडे अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष बने, क्लब अध्यक्षा सौ. स्मिता लाड यांचा विश्‍वास सार्थ ठरवत सर्व स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. मूळचा तामनाळे गावचा हा सुपुत्र देवरुख शहरात वास्तव्याला आला. वडील रवींद्र गिडये हे शिक्षक असल्यामुळे त्यांनी खेळाचे महत्त्व जाणले आणि त्याला संगमेश्‍वर तालुका तायक्वांदो अ‍ॅकॅडमीच्या नगर पंचायत देवरुख तायक्वांदो क्लबमध्ये त्याला प्रवेश मिळवून दिला.

मुळातच अभ्यासात हुशार असलेल्या या विद्यार्थ्याने खेळातही आपली हुशारी दाखवून दिली आहे. वडील, शाळेतील शिक्षक व खेळाचे प्रशिक्षक यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शने वेदांतला यशाचे शिखर गाठून दिले आहे. वेदांत हा जागतिक ब्लॅकबेल्ट फर्स्टदान कोरिया व राज्य पदक विजेता असल्यामुळे त्याची दखल शिक्षण बोर्डालाही घ्यावी लागली आणि त्याला खेळाचे 4 टक्के गुण देण्यात आले. त्यामुळे त्याने मिळविलेल्या गुणांनी सरासरी वाढली आहे. खेळाबरोबरच वेदांतने जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.

खेळामध्ये वेळोवेळी मिळविलेल्या यशाची दखल शैक्षणिक स्तरावर घेतली जात असल्यामुळे खेळाला विशेष महत्व प्राप्त झले आहे. भावी पिढी तंदुरुस्त रहावी आणि त्याचबरोबर खेळांमध्ये मिळविलेले यश विद्यार्थांना शैक्षणिक जीवनातही लाभदायक ठरावे या उद्देशाने शासकीय स्तरावर खेळाची दखल घेण्यात येत आहे. अरुंधती पाध्ये इंग्रजी शाळेत शिकणार्‍या वेदांतने जिल्हा राज्य पातळीवरील स्पर्धेत सातत्याने सहभाग घेऊन खेळात चमकदार कामगिरी केलेली आहे. मात्र, अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता अभ्यास अधिक खेळ याचा सुरेख समन्वय साधत 96.80 टक्के गुण मिळवत शाळेत पहिला क्रमांक मिळविला. एखाद्या खेळाडूने असे घवघवीत यश मिळवल्याबद्दल तायक्वांदोतर्फे त्याचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते युयूत्सू आर्ते, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, मोहन हजारे, अ‍ॅड. पूनम चव्हाण उपस्थित होत्या. जिल्हा पातळीवरील स्पर्धेत पदक  मिळविल्याबद्दल 3 टक्के, राज्यस्तरीय स्पर्धेत पदकाबद्दल 4 टक्के आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पदक मिळविल्याबद्दल 5 टक्के गुण वाढीव मिळत असल्यामुळे विद्यार्थींनी अभ्यासाबरोबर खेळाकडेही लक्ष द्यावे, असे अवाहन प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी यांनी केले आहे.