होमपेज › Konkan › वेदांत दुधाणेचा विक्रमी सुवर्णवेध!

वेदांत दुधाणेचा विक्रमी सुवर्णवेध!

Published On: Mar 03 2018 1:49AM | Last Updated: Mar 02 2018 8:29PMसावर्डे : वार्ताहर

श्री विठ्ठलराव जोशी ट्रस्ट-एसव्हीजेसीटी आयोजित चौथ्या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात पुण्याचा राष्ट्रीय खेळाडू वेदांत दुधाणेने धनुर्विद्या स्पर्धेत विक्रमी 348 गुणांसह सुवर्णपदकाचा वेध घेतला.

परशुराम भूमीत सलग चौथ्या वर्षी धनुर्विद्या खेळाची स्पर्धा लक्षवेधी ठरली. राज्यतील  धनुर्विद्यापटूंचा अचूक नेमबाजीचा खेळ कोकणवासियांना पहाण्यास मिळाला. डेरवणच्या मुख्य अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमच्या हिरवळीवर धनुर्विद्येचा थरार उपस्थितांनी अनुभवला. या स्पर्धेत सर्वांची मने जिंकली ती 10 वर्षीय वेदांत दुधाणेने. 12 फेर्‍यांमध्ये 360 पैकी 348 गुणांची कमाई करीत 10 वर्षांखालील मुलांच्या इंडियन 10 मीटर प्रकारात वेदांतने नवा विक्रम प्रस्थापित केला.

मुलाच्या 10 वर्षांखालील भारतीय शैलीच्या प्रकारात सुरूवातीपासून चुरस दिसून आली. पुणे व सातार्‍यातील राष्ट्रीय खेळाडूंनी 300 पैक्षा अधिक गुण संपादन करून पदकासाठी शर्थ करताना दिसत होते. राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता वेदांतने सर्वांना मागे टाकून विक्रमी गुणांचा पल्ला पार केला. स्पर्धेत सोलापूरच्या अजित मानेने 335 गुणांसह रौप्यपदक कमवले तर सातार्‍याच्या भावेश महाडिकने 332 गुणांची खेळी करीत कांस्यपदकाची कमाई केली.

स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी दुपारच्या सत्रात मुंबई, सोलापूर, पुणे व  सातार्‍यातील खेळाडूंनी पदकाची लयलूट केली. पुण्याच्या वेदांतने 10 वर्षांखालील गटात सुरूवातीपासून आघाडी घेत सुवर्णपदकाचा करिश्मा घडविला. तब्बल 25 वेळा 10 पैकी 10 गुणांची लक्षवेधी खेळी करीत वेदांतने डेरवण स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदकावर नाव कोरले.  2016, 2017 च्या स्पर्धेत रिकर्व्ह गटात खेळत असताना त्याने अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले होते. सलग तिसर्‍या वर्षी खेळत पदकाची हॅटट्रिक त्याने सुवर्णपदकाने साजरी केली.

पुण्यातील गोळवळकर विद्यालयात इयत्ता पाचवीत वेदांत शिकत असून धनुर्विद्या स्पर्धेतील त्याचे हे 28 वे पदक आहे. तो आर्चर्स अ‍ॅकॅडमीत रणजित चामले, ओंकार घाडगे, सागर मोरे, सुधीर पाटील, अनिल सोनावणे यांच्याकडे प्रशिक्षण घेत असतो. 9 वर्षांखालील तिरूपती येथील पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेत ऑलिम्पिक प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा तो देशातील पहिला खेळाडू ठरला होता.

चिपळूण जन्मभूमी असलेल्या वेदांत म्हणाला की, गेली तीन वर्षे मी सोनेरी कामगिरीसाठी झटत होतो. डेरवण स्पर्धेतील रौप्य व कांस्यपदक माझ्याकडे होते. आता अपुरे असलेले सुवर्ण माझ्या पदकाच्या यादीत झळकत आहे. या स्पर्धेमुळे मला जिंकण्यासाठी ऊर्जा  मिळणार आहे.