Thu, Mar 21, 2019 23:21
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › वेंगुर्ले पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प देशासाठी आदर्श!

वेंगुर्ले पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प देशासाठी आदर्श!

Published On: Apr 13 2018 10:36PM | Last Updated: Apr 13 2018 9:10PM     वेंगुर्ले : शहर वार्ताहर 

शासनातर्फे स्वच्छ अभियान घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास  मंजूर निधी  पूर्ण क्षमतेने वापरून वेंगुर्ले नगरपरिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर नंबर एक चा प्रकल्प ठरणार असल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले.

 गिरप म्हणाले, वेंगुर्ले नगरपरिषदेने स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत घरोघरी जावून कचरा संकलन, वर्गीकरण आणि त्यावर प्रक्रिया करण्याचे काम केलेे आहे. संकलित कचर्‍यातील यामध्ये ओला कचर्‍यापासून बायोगॅस निर्मिती, सुका कचर्‍यातील पालापाचोळा लाकडे क्रश करून त्यापासून जळाऊ ब्रिकेट निर्मिती, प्लास्टिक क्रश करून रस्ते निर्मिती तसेच काचेच्या व प्लॅस्टिकच्या बॉटल्स, कागद  भंगारात विक्रीकरून त्यापासून न.  प.  चे उत्पन्न वाढवण्यास मदत होत आहे. तसेच नगरपरिषदेकडून गांडूळ आणि कंपोस्ट खतही तयार करण्यात येते. 100 टक्के प्रक्रिया करण्यात आल्यामुळे उर्वरित कंपोस्ट डेपोमधील जागेवर नगरपरिषदेने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केलेली आहे. सध्या या कंपोस्ट बागेचे रूपांतर ‘स्वच्छ भारत पर्यटन स्थळा’ मध्ये झालेले आहे. वेंगुर्लेतील नागरिक, बाहेरून आलेले पर्यटक ,अभ्यासक आणि इतर नागरिक व महाराष्टातील सर्वच नगरपरिषद, महानगरपालिका, ग्रामपंचायती व इतरांसाठी हे आदर्श मॉडेल ठरले आहे. 

वरीलप्रमाणे उत्कृष्ट काम केलेले असल्याने शासनाकडून वेंगुर्ले नगरपरिषदेला वेळोवेळी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. यामध्ये हागणदारीमुक्त शहर, स्वच्छ शहर, उत्कृष्ट मुख्याधिकारी, वसुंधरा पुरस्कार 2016, कोकण विभागात प्रथम नगरपरिषद, महाराष्ट्रराज्यात स्वच्छता अभियानात उत्कृष्ट काम केलेले असल्याने शासनाकडून प्रथम पुरस्कार, वसुंधरा पुरस्कार 2017 अशा वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. सदरचे स्वच्छ अभियान ज्यावेळी सुरू झाले त्यावेळी वेंगुर्ल्यातील नागरी, प्रशासन आणि तत्कालीन कौन्सिल सदस्य यांच्या सहकार्यातून वेंगुर्ले नगरपरिषदेचे नाव देशपातळीवर उंचावण्यासाठी अथक प्रयत्न केले होते. शासनामार्फत नियुक्त केलेल्या एजन्सीने वेंगुर्ले नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देऊन यांमधील उणिवा दूर करण्यासाठी डीपीआर तयार करून मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. डीपीआर मधील कामांना स्वच्छ अभियान घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास  9  एप्रिल   रोजी कामे करण्यासाठी 1 कोटी18 लाख 77 हजार 978 रु.  एवढा निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये तीन नवीन घंटागाड्या, सुका कचरा क्रश करण्यासाठी श्रेडर मशीन, वजन काटा, ऑफिस रूम, इन्सिनेटर, तारेचे कंपाउंड, व्हर्मी कंपोस्टींग युनिटसाठी शेड, लीचेड गोळा करण्यासाठी पीट, खराब कचरा वेगळा  करण्यासाठी प्लॅटफॉर्म, फायर आणि इंस्टीगूशर, बॅक हूक लोडर, प्लॅस्टिक बेलींग मशीन याप्रकारे कामांचा समावेश आहे. हा निधी पूर्ण क्षमतेने वापरून वेंगुर्ले नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर नंबर 1 प्रकल्प ठरेल. तसेच हा  घनकचरा प्रकल्प सर्वांसाठी आदर्शवत ठरेल. असा विश्‍वास नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी व्यत केला.