Sat, Jul 20, 2019 15:52होमपेज › Konkan › साहसप्रेमींसाठी व्हॅली क्रॉसिंगचा थरार!

साहसप्रेमींसाठी व्हॅली क्रॉसिंगचा थरार!

Published On: Dec 20 2017 1:41AM | Last Updated: Dec 19 2017 11:08PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरीतील नामांकित गिर्यारोहण संस्था ‘रत्नदुर्ग माऊटेंनिअर्स’तर्फे भाट्ये येथे तीन दिवस व्हॅली क्रॉसिंगचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे येथील कातळ कड्यावर 180 फूट उंचीवरून 900 फूट अंतरापर्यंत रोपवरून हवेत अधांतरी प्रवास करण्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

‘रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स’तर्फे स्थापनेपासून 22 वर्षे विविध उपक्रम आयोजित केले जातात. यामध्ये गिर्यारोहण, केव्हिंग तसेच व्हॅली क्रॉसिंगचा समावेश आहे. मागील चार वर्षे व्हॅली क्रॉसिंगचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे. नाताळच्या कालावधीत शाळांना सुट्टी असल्याने याचे आयोजन दि. 23 ते 25 डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत हा उपक्रम होणार आहे. याचे उद्घाटन आ. उदय सामंत आणि नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या उपस्थितीत होणार आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ‘रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स’चे 23 सदस्य मेहनत घेत आहेत. यामध्ये ‘इंडियन माऊंटेनिअर्स’चे 11 नोंदणीकृत सदस्य आणि एका अ‍ॅडव्हान्स प्रशिक्षण घेतलेल्या सदस्याच्या समावेश आहे. या उपक्रमात मुंबई, पुणे येथील पर्यटकही सहभागी होणार आहेत.

हा उपक्रम रत्नागिरीच्या पर्यटनवाढीस चालना देण्यासाठी उपयुक्‍त ठरणारा आहे. यामध्ये प्रवेश मर्यादित असून,  प्रथम येणार्‍या 100 जणानांच संधी मिळणार आहे. प्रवेश निश्‍चित करण्याची अंतिम तारीख 20 डिसेंबर आहे. 

नावे नोंदवण्यासाठी संजय खामकर, किशोर सावंत, वीरेंद्र वणजू, शेखर मुकादम यांच्याशी संपर्क साधावा. नावे नोंदविण्यासाठी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन ‘रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स’च्या नेत्रा शिर्के व अन्य सदस्यांनी केले आहे.