Sun, Aug 18, 2019 14:34होमपेज › Konkan › वैभववाडीसह तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा

वैभववाडीसह तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा

Published On: May 18 2018 1:17AM | Last Updated: May 17 2018 10:41PMवैभववाडी : प्रतिनिधी

वैभववाडी तालुक्याला गुरुवारी सायंकाळी जोरदार चक्रीवादळ व पावसाचा तडाखा बसला.  शहरातील व्यापार्‍यांची  लाखो रुपयाची हानी झाली आहे. शहरात अर्बन बँकनजीक झाड व वीज खांब उमळून पडल्याने वैभववाडी- गगनबावडा मार्गावरील वहातूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती. नावळे येथील दोघजन जखमी झाले आहेत.  

संभाजी चौकातील माईणकर यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.    सुदैवाने तेथे रहदारी नसल्याने जीवित हानी टळली. गुरुवारी दुपारनंतर बाजारपेठ बंद असल्याने  रहदारी कमी होती.  सोनाळी- फोंडा  व वैभववाडी- तरळे मार्गावर झाडे पडल्यामुळे वहातूक विस्कळीत झाली होती.  वैभववाडी दत्तमंदिर नजीक सुहास राणे यांच्या घरावर वडाच्या झाडाची फांदी पडून घराचे नुकसान झाले आहे.  शारंधर देसाई यांच्या ओमनी गाडीवर झाड पडून गाडीचा चक्‍काचूर झाला.  

गुरूवारी सायंकाळी झालेल्या चक्रीवादळचा जोरदार फटका वैभववाडी शहराला बसला. वैभववाडी गगनबावडा मार्गावर झाड व वीज खांब उमळून पडल्याने मार्ग ठाप्प झाला होता.  दोन्ही बाजूने वाहानांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहातूक पोलिसांची तारांबळ उडाली. करुळ येथील अरुण चव्हाण यांच्या घरावरील पत्रे वादळाने जमिनदोस्त झाले.  रविकांत सावंत, सीमाबाई सावंत यांच्या डोक्यावर कौले पडल्याने हे दोघ जखमी झाले आहेत.त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.   या चक्रीवादळाचा तडाखा सर्वात जास्त महावितरण कंपनीला बसला. शहरातील व गावातील ठिकठिकाणचे सिमेंट खांब मोडून जमीनदोस्त झाले आहेत.  वीज पुरवठा खंडीत झाला झाला आहे. एडगाव सिमेलत असलेले सिमेंट गोडावूनचे पत्रे उडाले आहेत.तालुक्याच्या ग्रामीण भागातही वादळी पावसामुळे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबत तपशिलवार माहिती सायंकाळी उशिरापर्यंत मिळू शकली नाही.