Wed, Jan 23, 2019 04:47होमपेज › Konkan › कुसूर येथील शिक्षकाला अडीच लाखांचा गंडा

कुसूर येथील शिक्षकाला अडीच लाखांचा गंडा

Published On: Jul 20 2018 11:24PM | Last Updated: Jul 20 2018 10:36PMवैभववाडी : प्रतिनिधी 

बँक एटीएम कार्डसंबंधी माहिती विचारून विलास पांडुरंग पाष्टे (वय 47, रा. कुसूर पिंपळवाडी) या प्राथमिक शिक्षकाच्या एका बँकेतील वैभववाडी येथील खात्यातून गेल्या पाच दिवसांत अज्ञातांनी 2 लाख 49 हजार 785 रुपये परस्पर हडप केले. याबाबत शिक्षकाने वैभववाडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

कुसूर-पिंपळवाडी येथील विलास पाष्टे हे नाधवडे-सरदारवाडी येथे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांनी खोली घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखा नाधवडे येथून 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी 2 लाख 35 हजार रुपयाचा चेक त्यांनी  स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वैभववाडी येथील बचत खात्यात  15 जुलै रोजी जमा केला होता. 16 जुलै रोजी सायंकाळी 5.45 वा. सुमारास त्यांच्या बीएसएनएल कंपनीच्या मोबाईल नंबरवर अज्ञात इसमाचा फोन आला. मी स्टेट बँक ऑफ इंडियाचा मॅनेजर बोलतोय, असे सांगत त्यांनी तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे. तुमचे एटीएम जुने आहे. ते चालू करण्यासाठी तुम्हांला आधार कार्ड व पॅन कार्ड बँकेत जमा करावे लागतील, असे सांगितले.

तोपर्यंत मी तुम्हाला तुमचे एटीएम चालू करुन देतो, असे सांगितले. त्यांनी त्यासाठी एटीएमचा कार्डचा 19 अंकी नंबर विचारुन घेतला. त्यानंतर त्यांनी मोबाईलवर आलेला ओटीपी(वन टाईम पासवर्ड) विचारुन घेतला. 16 जुलै रोजी त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया वैभववाडी शाखेतील बचत खात्यातील दिवसभरात तीनवेळा एकूण 49 हजार 997 रुपये परस्पर काढण्यात आले. त्याचप्रमाणे 17 ते 20 जुलै दरम्यान दरदिवशी 49 हजार 997 रुपये परस्पर काढले. ही बाब पाष्टे आज बँकेत चेक जमा झाला का हे पाहण्यासाठी गेले असता त्यांच्या  निदर्शनास आली. आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच त्यांनी तातडीने आपले एटीएम कार्ड बंद करुन याबाबत वैभववाडी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बँक खातेदारांना त्यांचे आधारकार्ड व पॅन कार्ड लिंक करण्याचे सांगून त्यांच्याकडून एटीएम नंबर मिळविला जातो व अशाप्रकारे बँक खातेदारांच्या फसवणुकीचे प्रकार वारंवार घडत आहेत. तरी याबाबत सर्वांनी जागृत राहून अशा फोनद्वारे आपली माहिती कोणालाही देवू नये. तसेच याबाबत बँकांनीही आपल्या ग्राहकांची जनजागृती करावी, असे आवाहन वैभववाडी पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाखारे यांनी केले आहे.