Mon, May 20, 2019 20:06होमपेज › Konkan › वैभववाडी बसस्थानकात विद्यार्थ्यांनी रोखल्या एसटी

वैभववाडी बसस्थानकात विद्यार्थ्यांनी रोखल्या एसटी

Published On: Jul 17 2018 11:00PM | Last Updated: Jul 17 2018 10:29PMवैभववाडी : प्रतिनिधी

वैभववाडी तालुक्यात ‘मानवविकास’ अंतर्गत सुरु असलेल्या एस.टी बस अनियमीत धावत असल्याच्या निषेधार्थ कोकीसरे  विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी सायंकाळी वैभववाडी एस.टी.स्टँडमध्ये अर्धा तास एस.टी.बसेस रोखल्या. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत पर्यायी एस.टी. उपलब्ध करुन देताच विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले.

कोकीसरे विद्यालय सायंकाळी 5 वा. सुटते. मात्र, या विद्यार्थ्यांसाठी असलेली ‘मानवविकास’ ची एसटीबस नेहमी अर्धा ते पाऊण तास उशिरा पोहोचते. त्यामुळे कोकीसरे, नापणे, नाधवडेकडे जाणार्‍या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होतात. याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत शाळा सुटताच वैभववाडी एस.टी.स्टँड गाठले व एसटी रोखो आंदोलन सुरु केले. सभापती लक्ष्मण रावराणे, काही पालक, शिक्षक उपस्थितीत होते.  विद्यार्थ्यांनी कणकवली-जांभवडे, वैभववाडी- नापणे व विजयदुर्ग-पाचल या गाड्या रोखून धरल्या. वाहतूक नियंत्रकांच्या ठोस आश्‍वासनाशिवाय  आंदोलन मागे न घेण्याचा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक पोलिस अनमोल रावराणे व दशरथ घाडीगांवकर यांनी वाहतूक नियंत्रकांशी चर्चा केली. स्टँडसमोर असलेली नापणे एस.टी. व्हाया कोकीसरे सोडण्यात येत असल्याचे सांगताच विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले. यावेळी कोकीसरे विद्यालयातील शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.  मानव विकास योजनेतंर्गत वैभववाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पाच एस.टी.बस देण्यात आल्या आहेत.  मात्र, या एस.टी.बस नेहमीच अनियमीत धावत असल्यामुळे लहान लहान विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या बस नियमीत सोडाव्यात अशी मागणी विद्यार्थी व पालकांमधून केली जात आहे.