Fri, Apr 26, 2019 00:04होमपेज › Konkan › तिरवडे तर्फ सौंदळ येथे घर बेचिराख

तिरवडे तर्फ सौंदळ येथे घर बेचिराख

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वैभववाडी : प्रतिनिधी 

तिरवडे तर्फ सौंदळ इंदूलकरवाडी येथील सुवर्णा सुरेश पावसकर या वृद्ध  विधवा महिलेचे राहते घर शॉर्टसर्किटने जळून बेचिराख झाले. ही घटना रविवारी रात्री 9 वा. सुमारास घडली. तिरवडे - इंदूलकरवाडी येथील सुवर्णा पावसकर ही विधवा महिला मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करते. या घरात ती एकटीच राहत होती. रविवारी रात्री जेवण झाल्यावर ती वाडीत टी. व्ही. बघण्यासाठी शेजार्‍यांकडे गेली होती. दरम्यान, घरात आग पेटली.

यात घरातील सर्व साहित्य, अन्नधान्य, कपडालत्ता सर्व जळून खाक झाले. घराच्या छपराने पेट घेतल्यानंतर वाडीतील ग्रामस्थांना घराला आग लागल्याचे दिसले.  त्यानंतर आग विझविण्याचा ग्रामस्थांनी खूप प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीने उग्ररुप धारण केले. या आगीत पूर्ण घर जळून खाक झाले. यामुळे सुमारे 1 लाख रुपयांपेक्षा मोठे नुकसान झाले आहे. विधवा वृद्ध महिलेचा अन्न, वस्त्र, निवारा या आगीत भस्मसात झाल्याने तिच्यावर संकट कोसळले आहे.  या वृद्ध विधवा महिलेचे घर जळून खाक झाले. तरी सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत शासकीय यंत्रणेला कोणतीच माहिती नव्हती.