Wed, Mar 27, 2019 02:10होमपेज › Konkan › वैभववाडीचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण

वैभववाडीचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण

Published On: Aug 07 2018 10:54PM | Last Updated: Aug 07 2018 9:33PMवैभववाडी : प्रतिनिधी

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वैभववाडी तालुक्यातील सडुरे गावचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (वय 36) यांना वीरमरण आले. हे वृत्त तालुक्यात पसरताच शोककळा पसरली आहे. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे वैभववाडी-सडुरे गावठाण येथे वडिलोपार्जित घर आहे. त्यांचे सध्या वास्तव्य ठाणे-मीरारोड शीतलनगर येथे होते. 

भारतीय सैन्य दलात 36 रायफल बटालियनमध्ये ते मेजर म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. त्यांच्यासोबत अन्य तीन जवानांनाही वीरमरण आले.
 मेजर कौस्तुभ राणे हे सण-उत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी सडुरे येथे येत असत. त्यांच्या निधनाचे वृत्त दुपारी त्यांच्या मूळ गावी समजल्यावर गावावर शोककळा पसरली आहे. सडुरे माजी सरपंच विजय रावराणे यांचे ते पुतणे होत. त्यांचे नातेवाईक अंत्यदर्शनासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे.