Sun, Apr 21, 2019 03:58होमपेज › Konkan › समाजकल्याण विभागाचा भार तिघांवरच

समाजकल्याण विभागाचा भार तिघांवरच

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 26 2018 8:27PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागातील रिक्‍त पदामुंळे कामकाजावर परिणाम होत आहे. या विभागाचा कारभार सभापती, स्वीय सहायक आणि लिपिका या तिघांवरच आहे. यामुळे कामांचा निपटारा होण्यास विलंब लागत आहे. ही पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी होत आहे.

तळागाळातील गावपातळी पर्यंतच्या अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, अपंग व दुर्बल इ. घटकांना  शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, वैयक्‍तिक व कौटुंबिक लाभाच्या योजनांचा लाभ घेता यावा जेणेकरून त्याचे जीवनमान उंचविता येईल व त्यांना सर्व सोयी-सुविधांचा लाभ घेता येईल. यासाठी समाजकल्याण विभाग सतत प्रयत्नशील आहे. मात्र, अधिकारी, कर्मचार्‍यांच्या मंजूर पदे 13 पैकी अवघी तीनच पदे भरलेली असल्यामुळे जिल्हा परिषद समाजकल्याणचा कारभार सभापती, स्वीय सहायक आणि लिपिकावरच आहे. 

जिल्हा परिषद बजेटच्या वीस टक्के निधी खर्च करण्याची जबाबदारी या खात्यावर आहे. रिक्‍त पदे भरण्यासाठी वारंवार प्रस्ताव पाठवूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने कारभारावर परिणाम होत आहे.

जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक सुमारे सत्तावीस कोटींपर्यंत असते. त्यातील सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी समाजकल्याण विभागाला मिळतो. अपंगांसाठी पाच टक्के निधी उपलब्ध असतो. विकासकामांच्या याद्या तयार करणे, परिपूर्ण प्रस्ताव तयार करणे, तांत्रिक मंजुरी घेणे यांसह कामांवर लक्ष ठेवणे या गोष्टींसाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी लागतात. सध्या समाजकल्याण अधिकारी पदाचा कार्यभार पशुधन विकास अधिकार्‍यांकडे आहे. कार्यालयीन अधीक्षक, दोन निरीक्षक, वरिष्ठ लिपिक 2, कनिष्ठ लिपिक 1, वाहन चालक 1, शिपाई 3 अशी पदे रिक्‍त आहेत.

अपंग कक्षातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता आणि सहायक सल्लागार ही पदेही रिक्‍त आहेत. तेरापैकी तीनच पदे भरलेली असल्यामुळे कामकाज चालविताना सभापतींसह कार्यरत कर्मचार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. जिल्हा परिषद निधी, नियोजनचा निधीतील कामांच्या याद्या तयार करण्याचे काम वेगाने सुरु आहे. त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचेही दिसत आहे.